पवारांना फसवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 02:52 PM2024-11-18T14:52:13+5:302024-11-18T14:52:34+5:30
विधानसभा निवडणुकीतच त्यांना जनताच उत्तर देईल, असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले.
काटी: गद्दार या शब्दाला महाराष्ट्राने कधीही माफ केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर गद्दारांचे हात कापण्याचे, कडेलोट करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता २१ व्या शतकात, मराठी माणसाला फसवलेले कधी आवडत नाही. त्यामुळे शरद पवार यांना फसवण्याचे गद्दारी करण्याचे काम ज्यांनी केले त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. विधानसभा निवडणुकीतच त्यांना जनताच उत्तर देईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ रविवार ता. १७ रोजी काटी (ता. इंदापूर) येथे जाहीर सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची पार पडली. या वेळी जयंतराव पाटील बोलत होते. या वेळी, पंचायत समितीचे माजी सभापती विलास बापू वाघमोडे, नीरा भीमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, अॅडवोकेट राहुल मखरे, तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, विकास लावांडे, मदन पाटील, कृष्णाजी यादव, छायाताई पडसळकर, अमोल भिसे, शालनताई भोंग, बबलू पठाण, किशोर पवार, सुरेश जगदाळे, बाबासाहेब खारतोडे, प्रफुल्ल चव्हाण, अमर काळकुटे, दत्तात्रय माने, तानाजी नाईक, प्रभाकर खाडे, बापू चंदनशिवे, अशोक घोगरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय बाबर, दीपक जगताप, अमर बनसोडे, किरण जगताप, नागनाथ जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी तुम्हाला काय नाही दिले, आमदारकी दिली, मंत्रिपद दिले, इतकं प्राधान्य तुम्हाला सतत दिलं. अकरा-बारा मंत्री घ्यायचे ठरले तरी, यांना मंत्रिपदात घेतले. आज दुर्दैवाने त्याच पवार साहेबांना, ही माणसं सोडून गेली. गेली ती, गेली,बाकीची आवाज तरी काढत नाहीत, हा तुमचा मामा लय आवाज काढायला लागला, गेल्यानंतर एवढा उर्मटपणा आणि पवार साहेबांना चॅलेंज करणे हे इंदापूरची जनता कधीही माफ करणार नाही, अशी टीकाही आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता त्यांनी केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, गेली दहा वर्षे येथील लोकप्रतिनिधींनी चुकीची कामे केली आहे. जयंत पाटील मंत्री असताना त्यांनी पाच टीएमसी पाण्याचा सर्व्हे करण्याचे पत्र दिले. मात्र, यांनी तालुक्यातील जनतेला मंजुरीचे पत्र आहे म्हणून फसवले. स्वार्थासाठी येथील लोकप्रतिनिधी, पवार साहेबांना सोडून गेले. त्यामुळे मतदारांनी त्यांना जागा दाखवावी.