पुणे : ज्येष्ठ समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांची ९६ वी जयंती २२ जून २०२४, शनिवार रोजी साजरी होत आहे. यानिमित्त भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेना यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार, २०२४’ हा राष्ट्रीय पुरस्कार यंदा पत्रकार निरंजन टकले यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती भाई वैद्य फौंडेशनच्या चिटणीस, प्रा. डॉ. गीतांजली वैद्य यांनी दिली आहे.
भाई वैद्य यांच्या जन्मदिनी २२ जून २०२४, शनिवार रोजी, संध्याकाळी ५.३० वाजता एस.एम.जोशी फौंडेशन, सभागृह, नवी पेठ, पुणे येथे भाई वैद्य फाऊंडेशन आणि आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार साहित्य, कला, संस्कृती, इतिहास, विज्ञान, संशोधन, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादी क्षेत्रांमधील त्या व्यक्तीचे राष्ट्रीय पातळीवरील योगदान आणि त्या क्षेत्राचे भविष्यात नेतृत्व करण्याची क्षमता लक्षात घेवून दिला जातो. निरंजन टकले हे बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स असून त्यांनी शोध पत्रकारितेत यशस्वी कारकीर्द केली आहे. त्यांनी वृत्तपत्र, चॅनलमध्ये काम केले आहे. तसेच अनेक इंग्रजी, हिंदी, मराठी वृत्त वाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचा सहभाग राहिला आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीच्या काळात निरंजन टकले यांनी जीवाची पर्वा न करता २०१७ मध्ये न्या. लोया यांच्या हत्येचा तपास ‘कारवॉ’ साठी फ्रीलांस पत्रकार म्हणून केला. यावर त्यांनी ‘हू किल्ड लोया’ हे लिहिलेले पुस्तक प्रचंड गाजले आहे.