पाण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागणार : हर्षवर्धन पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 01:42 PM2019-07-25T13:42:36+5:302019-07-25T13:45:56+5:30

जलसंपदा खात्याने नीरा डावा कालव्याच्या इंदापूर तालुक्यातील पाणीवाटपाबाबत अन्यायकारक धोरण राबविले आहे.

People's movement must be set up for water: Harshvardhan Patil | पाण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागणार : हर्षवर्धन पाटील 

पाण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागणार : हर्षवर्धन पाटील 

Next
ठळक मुद्देजलसंपदा खात्याच्या नव्या धोरणाचा फटका इंदापूर तालुका कायम दुष्काळी राहणार असल्याचा आरोप

इंदापूर ( निमसाखर) : जलसंपदा खात्याने नीरा डावा कालव्याच्या इंदापूर तालुक्यातील पाणीवाटपाबाबत अन्यायकारक धोरण राबविले आहे. धोरणामुळे आगामी काळात इंदापूर तालुक्याचे वाळवंट होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील तीनही साखर कारखान्यांवर संकट ओढवणार आहे. धोरणबदलाबाबत त्वरित दखल घ्यावयाची गरज असून मोठे जनआंदोलन व न्यायालयीन लढा उभा करावा लागणार आहे, अशी माहिती माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे दिली. 
  निमसाखर (ता.इंदापूर)येथे एका खासगी भेटीदरम्यान पाटील आले असता त्यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. गेली वीस वर्षांपासून तालुक्यातील पाणी वाटपाची वहिवाट गेल्या पाच वर्षात मोडून काढल्यामुळे ही आज परिस्थिती उद्भवली आहे. इंदापूर तालुक्याला मिळणाऱ्या साडेबावीस टीएमसीपैकी दहा टीएमसी पाणी यापुढे तालुक्याला मिळणार नाही. परिणामी इंदापूर तालुका कायम दुष्काळी राहणार असल्याचा आरोप पाटील यांनी केला. 
पाटील पुढे म्हणाले की, ‘ इंदापूर तालुका शेतीच्या पाणीवाटपाबाबत कायमच टेलएण्डचा (शेवटचा) तालुका म्हणून ओळखला जातो. भाटघर धरणाच्या निर्मिती वेळेस नीरा डावा कालवा फाटा क्रमांक ४६ ते फाटा क्रमांक ५९ या उपकालव्याद्वारे तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले होते.  आघाडी सरकारच्या काळात सिंचनाच्या क्षेत्रांमध्ये मोठी वाढ झाल्याचे लक्षात आल्याने खडकवासला, नीरा-देवघर अशा दोन्ही धरणातून सणसर कटद्वारे इंदापूर तालुक्यातील सुमारे ७५ ते ७८ टक्के क्षेत्र ओलिताखाली आणले होते. बारामती तालुक्यातील फक्त साधारण ३५ टक्के ओलिताखाली आले होते. शेटफळ तलावात त्यावेळी दोन टीएमसी पाण्याचा साठा करण्यात येत होता. सर्वसाधारण सिंचनासाठी २२ टीएमसी पाणी मिळत होते. मात्र जलसंपदा खात्याने नुकताच एक निर्णय घेतला असून त्यामध्ये इंदापूर तालुक्याचे सहा टीएमसी पाणी उडवण्यात आले आहे. नवीन आराखड्यानुसार खरिपासाठी पाच टीएमसी, रब्बीसाठी चार आणि उन्हाळी हंगामासाठी अडीच टीएमसी असे आवर्तन देण्यात येणार आहे. मात्र इंदापूर तालुक्याला प्रत्यक्षात किती पाणी मिळणार हा प्रश्नच आहे.  २२ गावातील शेतकºयांना ७ नंबर अर्जावर (तात्पुरती पाणी परवानगी) गेल्या वीस वर्षापासून देण्यात येत असलेल्या पाणी आवर्तनाचा प्रश्नच येणार नाही.  
........
शेती उत्पादनावर सर्वाधिक परिणाम
जलसंपदा खात्याच्या नवीन निर्णयामुळे नीरा-देवघर धरणातून मिळणारे पाच टीएमसी पाणी त्याप्रमाणे सणसर कट मधून मिळणारे बहुतांश पाणी आता मिळणार नाही. तसेच शेटफळ तलावासाठी मिळणारे दोन टिएमसी पाणीही मिळणार नाही. उन्हाळी हंगामात किमान दोन आवर्तनाची गरज असते त्याद्वारे चाऱ्याचे उत्पादन, उन्हाळी हंगामातील पिके यांना पाणी मिळते. पण उन्हाळी हंगामात फक्त एक वेळेला आणि तेही पाणी असेल तर आवर्तन देण्यात येणार आहे . शेती उत्पादनावर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. 
....

Web Title: People's movement must be set up for water: Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.