‘त्या’ लोकप्रतिनिधीची अजित पवारांकडे तक्रार करणार: ‘रासप’चे खुले आव्हान
बारामती: गेल्या वर्षभरापासून कोरोना संकट आहे. प्रत्यक ठिकणी जो तो लोकप्रतिनिधी काम करताना दिसत आहे. मात्र, बारामती नगरपरिषद हद्दीतील जळोची भागात एखादा वगळता बाकी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दर्शन दुर्मीळच झाले आहे. त्यामुळे गावात लोकप्रतिनिधी दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी दिले आहे. दरम्यान, या लोकप्रतिनिधींची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे रासपच्या वतीने सांगण्यात आले.
जळोची परिसरात कोरोनाचे संकट असताना लोकप्रतिनिधी अगदी गावात येतच नाही असे म्हटले तरी चालेल, गावातील कोणा कोणाच्या काय काय अडचणी आहेत, कोणाला बेड मिळत नाही कोणाला औषध नाही, गेल्या कित्येक दिवसांपासून जळोची प्राथमिक शाळेत कोविड सेंटर करा ही मागणी आहे, लसीकरण केंद्र चालू करा ही मागणी आहे, तसेच गावात औषध फवारणी करा ही मागणी आहे, परंतु लोकप्रतिनिधी साधे बोलायला तयार नाहीत.गावाचा सोशल मीडिया ग्रुप आहे. तिथे लोकप्रतिनिधी गावाच्या या विषयावर बोलायला तयार नाहीत, लोकप्रतिनिधी स्वत:चे अर्थ कारण करण्यात, वाढदिवसाचे मेसेज करण्यात व्यस्त असल्याचा आरोप सातकर यांनी केला आहे.
———————————————
करे यांचे पती चिंचेच्या झाडाखाली दोन दिवस पडून होते
बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटू लता करे यांचे पती भगवान करे यांचे मंगळवारी (दि. ४ मे) कोरोनाने निधन झाले. मात्र, त्यानंतर ७ दिवसांनी भगवान करे यांच्याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी धक्कादायक माहिती पुढे आणली आहे. त्यानुसार भगवान करे हे हॉस्पिटलमधून उपचार घेत असताना निघून आले होते. दोन दिवस जळोची गावातील चिंचेच्या झाडाखाली पडून होते, तरीदेखील नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधी यांचे गावाकडे लक्ष गेले नसल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी केला आहे.