पटेल रुग्णालययात सुरू असलेले लसीकरण कार्यक्रम जानेवारीपासूनच नियमबाह्य, एकाधिकारशाही, हुकूमशाही पद्धतीने सुरू होता. पटेल रुग्णालयाला कमी पुरवठा होत असलेल्या लसीमुळे आणि लसीकरणाच्या वशिलेबाजीमुळे या गोंधळात आणखीच भर पडली आहे.
कोविन या सरकारी वेबसाईटवर नोंदणीच होत नसल्याचे मोठी तांत्रिक समस्या येथील नागरिकांसाहित हॉस्पिटल प्रशासनाला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे येथील कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे.
लसीकरण कार्यक्रमात मा. लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग, कर्मचारी, व्यापारी, मोठे कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असल्याने संपूर्ण लसीकरण केंद्रच त्यांच्या ताब्यात घेतल्याचे येथील नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
ऑनलाइन नोंदणी तर होतच नाही आणि नोंदणीसाठी पिनकोड बंधनकारक असल्याने लष्कर परिसरातील नागरिक कमी व सभोवतालच्या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत.
काही लोकप्रतिनिधी नियमबाह्य पद्धतीने आपल्या कुटुंबीय, मित्र, व्यापारी, यांचे लसीकरण करत असल्याचे सर्रास पाहायला मिळत आहे. लसीकरण करणाऱ्या नागरिकांची सेवा करण्याच्या नावाखाली त्यांना पाणी, फळे, बिस्किट, अल्पोपहार व हॉस्पिटलला मदत देत स्वतःच व स्वकीयांचे लसीकरण करून घेण्याचा घाणेरडा प्रकार देखील पाहायला मिळत आहे. सध्या या प्रकरणाचा आळा घालण्यासाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
कोट
मुळात लसीचा पुरवठाच कमी होत आहे. तरी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जास्त लसी पटेल रुग्णालयासाठी आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. काही समस्या आहे, ती सुधारण्याचा प्रयत्न करू. - डॉ. प्रकाश भोसले (नोडल अधिकारी)
लसीकरण कार्यक्रमात व्यवस्थापन अभाव आहे. यात वशिलेबाजीमुळे सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, याकडे प्रशासनाने लक्ष घालावे. यात लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनीही राजकारण करू नये. - विकास भांबुरे, नागरिक