बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी पाच टीएमसी पाणी मंजुरीचा आदेश शासनाने रद्द केला आहे. याप्रकरणी पुनर्विचार होऊन शासनाने रद्द केलेला आदेश पूर्ववत करून इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांचा पाणी प्रश्न तात्काळ निकालात काढण्यात यावा. अशा काही मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिंम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांनी उजणी धरण तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाच टीएमसी पाणी रद्द आदेशाचा पुनर्विचार व्हावा. आणि उजणीतून मराठवाड्याला २१ टीएमसी देण्यात येणारे पाणी तात्काळ बंद करण्यात यावे. नदी, कॅनाल याद्वारे सोलापूरसाठी बेकायदेशीर सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात यावे. सोलापूर जिल्ह्यात धरण ग्रस्तांच्या गावगुंडानी बळकावलेल्या जमिनी त्यांना परत करण्यात याव्यात. अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्यांचे आंदोलन सुरू होते.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी जाहीर पांठीबा देत असल्याचे पत्र आंदोलकांना दिले. यावेळी संजय सोनवणे म्हणाले की, शासनाने पाणी वाटपाबाबत इंदापूर तालुक्यावर अन्याय केला असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परीस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे शासनाने इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाणी प्रश्नांवर तोडगा काढून शेतकर्यांना न्याय द्यावा.