पुणे : ‘पालिका प्रशासनातील काही अधिकारी भ्रष्टाचार करतात व त्यामुळे लोकप्रतिनिधी बदनाम होतात’, ‘काम करण्यापेक्षाही ते टाळण्याकडेच पालिका प्रशासनाचा कल असतो’, ‘आयुक्त राजकारण करीत असतात’, ‘अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर बांधकामे उभी राहतात’... शहरातील बहुसंख्य आमदार तसेच पक्षसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाबद्दलचा आपला संताप अशा तीव्र शब्दांमध्ये ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केला. या वेळी बहुसंख्य वक्त्यांनी शहरातील वाहतूक, अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे यांबद्दल महापालिका आयुक्त तसेच अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सलग ३५ दिवस समाजातील विविध घटकांच्या समस्या ‘नागरिकांची सनद’ या सदरातून मांडल्या. त्यावरील चर्चेसाठी शहरातील खासदार, आमदार तसेच राजकीय पक्षसंघटनांचे शहराध्यक्ष यांचा संवाद ‘लोकमत’ कार्यालयात झाला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार अनिल भोसले, भीमराव तापकीर, विजय काळे, माधुरी मिसाळ, प्रा. मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेचे शहर संघटक सचिन तावरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, हेमंत संभूस, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी चर्चेत सहभाग घेतला. लोकमत एडिटोरिअल बोर्ड चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)
महापालिकेत टक्केवारीचे राजकारण
By admin | Published: December 23, 2016 12:43 AM