बारामती : बारामतीत कोरोनाच्या आठशे आरटीपीसीआर तपासण्या करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती येथे दिले.
शनिवारी (दि २६) बारामतीत प्रशासकीय भवन मध्ये जिल्हाधिकारी देशमुख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी देशमुख यांनी हे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी देशमुख पुढे म्हणाले कोरोनाबाधितांची संख्या वाढणाऱ्या गावात कडक उपाययोजना करा. त्यासाठी दररोज आरटीपीसीआरच्या आठशे तपासण्या व्हायलाच हव्यात. कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने तत्पर राहावे. आवश्यक उपाययोजना कराव्यात. रुग्णसंख्या वाढू नये याची योग्य दक्षता घ्यावी. कोरोना हाय अलर्ट, हॉट स्पॉट असणाऱ्या गावांवर विशेष लक्ष द्या. त्या भागाचे सर्वेक्षण करा. तेथील तपासण्या देखील वाढवा. लस उप्लब्धतेनुसार लसीकरणाचा वेग वाढवा.
दरम्यान, यावेळी देशमुख यांनी विकासकामांचा आढावा घेतला.
कन्हेरी येथील रोपवाटिका, रुई व महिला ग्रामीण रुग्णालयासही त्यांनी भेट दिली. विकासकामांबाबत असलेल्या अडचणी बाबत जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. कामे, योजना मार्गी लावण्यासह नगरपालिका, पंचायत समितीसह इतरही विभागांना त्यांनी आदेश दिले. तसेच
कसब्यातील जामदार रस्त्यावरील कोरोनाने निधन झालेल्या लोंढे कुटुंबाची देशमुख यांनी घरी जाऊन भेट घेतली. सुवर्णा नामदेव लोंढे यांच्या पतीचे कोरोनाने निधन झाले होते, त्यांना योजनांचा लाभ देण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.