लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या टाळेबंदीने अन्य उद्योग आणि व्यवसायांप्रमाणेच सुगंधी मालाचा व्यवसायही ठप्प झाला होता. दरवर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी सुगंधी मालाचा खप थेट ७० टक्क्यांनी घटला. नव्या वर्षात सुगंधी मालाचा बाजार हळूहळू पूर्वपदावर येत असून, सुगंधी मालाची विक्री वाढू लागली आहे.
प्रामुख्याने धार्मिक स्थळे उघडल्याने अगरबत्ती, कापूर, धूप, अष्टगंध, अत्तर, गुलाब पाणी या सुगंधी पदार्थांची मागणी वाढत आहे. लग्नसराई, मुंजी, बारसे, साखरपुडा, तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमही पूर्ववत सुरू झाल्याने सुगंधी पदार्थांची मागणी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर फडके हौद, मोती चौक, रविवार पेठ, पासोड्या विठोबा मंदिर येथील सुगंधी मालाची जुनी बाजारपेठ आहे. येथील परंपरागत विक्रेत्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
सुगंधी मालाची विक्री पिढ्यानपिढ्या करणारे व्यावसायिक पुण्यात आहेत. अनेकांचे ग्राहकही ठरलेले आहेत. पूर्वी लग्नसोहळ्यांमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांना अत्तर लावण्याचा, गुलाब पाणी शिंपडण्याचा प्रघात होता. अलीकडे यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. “दरवर्षी सुगंधी मालाच्या एका दुकानातून ४० ते ४५ लाख रुपयांची उलाढाल होते. गेल्या वर्षी यात ७०-८० टक्के घट झाली. नव्या वर्षात आता ३० टक्के वाढ झाली आहे,” असे निरीक्षण एका विक्रेत्याने नोंदविले.
चौकट
एरवी कोट्यवधींची उलाढाल
“मार्च २०२० पासून बंद असलेला व्यवसाय पाच-सहा महिन्यांनी सुरू झाला, परंतु धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने उलाढाल नव्हती. नागरिक घराबाहेर पडत नसल्याने अत्तरे, परफ्युमसारख्या सुगंधी द्रव्यांची मागणी घटली होती. एरवी शहरातला हा बाजार कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारा आहे. शहराच्या मध्यवर्ती बाजारात जिल्ह्यातलेही ग्राहक येत असतात. आता या बाजारात पुन्हा चहलपहल सुरू झाली आहे.”
-दिलीप धुत, विक्रेते
चौकट
सुगंधातली पाचवी पिढी
“आमची पाचवी पिढी सुगंधी मालाच्या व्यवसायात आहे. कित्येक वर्षांत कोरोनासारखे संकट आम्ही पाहिले नव्हते. अत्तर-परफ्युमची लाखोंची उलाढाल पुरती बंद झाली. गेल्या महिन्यापासून पुन्हा नागरिक खरेदीसाठी येऊ लागले आहेत. लवकरच व्यवसाय पूर्वीसारखा सुरळीत होईल.”
- नदीम अत्तार-जहागिरदार, विक्रेते
चौकट
अगरबत्ती, कापराला मागणी
“पूजा साहित्यात सुगंधी मालाला मोठी मागणी असते. अगरबत्ती, धूप आणि कापराच्या विविध प्रकारांना चांगला उठाव असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदावलेला बाजार लवकरच पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.”
-बाळकृष्ण गांधी, विक्रेते