"कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल..." खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:07 PM2024-04-27T12:07:45+5:302024-04-27T12:08:50+5:30
खडकवासला भागात महापालिकेमधील कामाचे भाजपचे अपयश दिसून येईल. पुण्यात सर्वाधिक प्रश्न हे महापालिकेचे आहेत. भाजपची सत्ता असताना मागील पाच वर्षांत पाणी, वाहतूक आणि कचऱ्याची समस्या वाढली आहे, असेही त्या म्हणाल्या...
पुणे :अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यावर टीकेचा रोख कायम ठेवला आहे. मात्र, दादा असे बोलतात याचे आश्चर्य असून, कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल, असा टोला सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.
त्या म्हणाल्या, ‘मी प्रथम देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती पाहते. मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही, तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आली आहे. दादा असे बोलतात याचे मला आश्चर्य वाटते, कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल. मात्र, सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत हे दुर्दैव आहे.’ उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राज्याचा कणखर नेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून पाहत होते. परंतु, आता जे अजित पवार दिसत आहेत, ते मूळचे अजित पवार नाहीत. आताच्या अजित पवारांची भाषणे ऐकली, की आश्चर्य वाटते. आमच्याशी ‘घटस्फोट’ होऊन सात महिने झाले. अठरा वर्षे एका संघटनेत आम्ही काम केले आहे. महायुतीच्या सगळ्या नेत्यांना मिळून शरद पवार यांना संपवायचे आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन हे बोलून दाखवले होते. हे षडयंत्र सुरू आहे. महायुतीकडून जी कृती केली जात आहे त्याने शरद पवारांना त्रास द्यायचा आहे, हे सिद्ध होत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
खडकवासला भागात महापालिकेमधील कामाचे भाजपचे अपयश दिसून येईल. पुण्यात सर्वाधिक प्रश्न हे महापालिकेचे आहेत. भाजपची सत्ता असताना मागील पाच वर्षांत पाणी, वाहतूक आणि कचऱ्याची समस्या वाढली आहे, असेही त्या म्हणाल्या.