पवार-काकडे राजकीय संघर्षाला पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 01:50 AM2018-12-16T01:50:42+5:302018-12-16T01:51:54+5:30
निंबूत गावातील उद्घाटनांना अजित पवार राहणार उपस्थित
सोमेश्वरनगर : पवार आणि काकडे या घराण्याचे १९६७ पासूनचे राजकीय संघर्ष जिल्ह्याला माहीत आहेत. मात्र आता यांच्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विविध उद्घाटनांसाठी काकडे यांचा बालेकिल्ला असलेल्या निंबूत गावात येणार आहेत.
पवार आणि काकडे घराण्यातील राजकीय वैर संपवण्याचा काकडे घराण्यातील प्रमुखांनी निर्णय घेतला आहे. या घराण्यातील शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे आणि जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे यांनी स्वत: निंबूत गावातील विविध उद्घाटनांसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांना निमंत्रित केले आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून काकडे घराण्याचे नेतृत्व सहकारमहर्षी मुगुटराव काकडे, बाबालाल काकडे व संभाजीराव काकडे यांनी, तर पवार घराण्याचे नेतृत्व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. गेल्या ५० वर्षांत तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुका असो की लोकसभेच्या, या पवार-काकडे घराण्यामध्ये झाल्या आहेत. सोमेश्वर कारखान्याची स्थापना काकडे घराण्याने केली. मुगुटराव काकडे आणि बाबालाल काकडे यांनी कारखाना स्थापनेपासूनकारखान्याची धुरा सांभाळली. १९९२ मध्ये बाबालाल काकडे आणि मुगुटराव काकडे यांचे पुत्र शहाजी काकडे यांना राष्ट्रवादीच्या तंबूत आणून अजित पवार यांनी १९९२ मध्ये कारखाना खेचून आणला. नुकतेच अजित पवार सोमेश्वर कारखान्यावर आलेले असताना सतीश काकडे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर गप्पा मारताना दिसल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. आज होत असलेल्या विविध विकासकामांसाठी अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.
सतीश काकडे यांच्या अजित पवार यांच्याशी जवळीकीने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यात घालमेल सुरू झाली आहे. दुसरीकडे शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते यांच्यातही सतीश काकडे जाहीर प्रवेश करणार की आपला शेतकरी कृती समिती पक्ष जिवंत ठेवणार, यामुळे घालमेल सुरू आहे. आज होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी जाहीर प्रवेशाबाबत काकडे काय निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.