पुणे : मे महिन्यात जागतिक मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त समाजबंध या संस्थेच्या वतीने महिनाभर ‘पिरियड रिव्हॉल्यूशन’हे अभियान राबवले जात आहे. ‘मासिक पाळीस पूरक समाज निर्मितीसाठी’ असे या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे.
मासिक पाळीविषयी समाजात असणाऱ्या अंधश्रद्धा व अज्ञान दूर करून महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी मासिक पाळीविषयी समाजात खुलेपणाने बोलले गेले पाहिजे. या अभियाना अंतर्गत मासिक पाळी या विषयावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये या विषयाला धरून पत्रलेखन, कविता लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला, मुलाखत, पोस्टर बनवणे, अनुभव कथन अशा अनेक स्पर्धा ऑनलाईन आयोजित केलेल्या आहेत. त्याचबरोबर समुपदेशन सत्र, कार्यकर्ता प्रशिक्षण, रेड डॉट बॅग बनवण्याची कार्यशाळा, पाळीविषयी प्रतिज्ञा, सखी फोनलाईन, विविध आस्थापनांना पाळीविषयी सजग करणारी ईमेल मोहीम, समाजमाध्यमांमध्ये चर्चासत्र असे उपक्रमही राबवले जाणार आहेत.
अभियानात कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभरातून अडीचशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सोशल मीडियाचा विधायक वापर करत सर्व कार्यकर्ते दररोज हजारो लोकांपर्यंत हा विषय पोहोचवत आहेत व जनजागृती करत आहेत. ज्यांना आपल्या कला-गुणांचा उपयोग प्रबोधनासाठी करायचा आहे अशांनी या स्पर्धांमध्ये अवश्य भाग घ्यावा, असे आवाहन समाजबंध संस्थेने केले आहे.
कोणत्याही प्रवेश फीविना सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष, मुले-मुली यात सहभागी होऊ शकतात. अभियान २८ एप्रिल ते २८ मे या कालावधीत राबवले जात असून या कालावधीत १ लाख लोकांपर्यंत पोहोचवण्याचा व १० हजार लोकांना यात थेट सामिल करून घेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी नागरिकांनी या परिवर्तनाच्या, प्रबोधनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सचिन आशा सुभाष यांनी केले आहे. स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी contactsamajbandh@gmail.com वर संपर्क साधता येईल.