पुणे : पालिकेच्या मालकीच्या इमारतींमधील भाडेकराराने देण्यात आलेल्या १ हजार २६० सदनिकांच्या विक्रीसाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मागील तीन दशकांपासून येथे रहात असलेल्या भाडेकरूंना ही घरे खरेदी करता येणार आहेत. यातून पालिकेला १०० कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी आशा स्थयी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केली.
पालिकेच्या मालकीच्या अशा २ हजार ९०० सदनिका आहेत. या सदनिकांचे व्यवस्थापन पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून पाहिले जाते. या सदनिकांची त्या त्या भागातील रेडिरेकनरच्या दराप्रमाणे विक्री केली जाणार आहे. सोमवारी शहर सुधारणा समितीच्या झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली होती. हा प्रस्ताव स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.
या सदनिका बारा ते पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या किमतीला विक्री केल्या जाणार आहेत. शहरातील विविध भागात रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन या सदनिकांमध्ये करण्यात आलेले आहे. त्यांना प्रति महिना ४५० रुपये भाडे आकारले जाते. या मिळकती संबंधित भाडेकरू यांच्या नावावर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.