पुणे : फक्त स्थायी समितीच्या सदस्यांसाठी म्हणून सोमवारी पालिका प्रशासनासाठी स्वतंत्र बैठक झाली. प्रशासन व स्थायी समिती सदस्य यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवकांना या बैठकीपासून बाजूला ठेवण्यात आले. समिती सदस्यांच्या प्रभागातील अपूर्ण कामांबाबत बैठकीत चर्चा होऊन त्या कामांना गती देण्याची सूचना करण्यात आली.गेले काही महिने स्थायी समिती सदस्यांमध्ये प्रभागातील विकासकामांवरून सतत कुरबुरी सुरू आहेत. अधिकारी कारणे सांगतात, कामांकडे लक्ष देत नाहीत; त्यामुळे अनेक कामे अपूर्ण आहेत, अशा तक्रारी सदस्यांकडून करण्यात येत आहेत. त्यातच समितीला आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह अनेक विभागप्रमुख सतत गैरहजर राहतात, त्यामुळे कामांबाबत काहीही चर्चा करता येत नाही. कार्यालयात स्वतंत्रपणे भेटण्यासाठी गेल्यावर अधिकारी भेटत नाहीत, असे काही समिती सदस्यांचे म्हणणे होते.सदस्यांकडून सतत अशा तक्रारी येत असल्यामुळे समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनीच पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले होते.समितीच्या बैठकांना वारंवार अनुपस्थित राहणारे आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, राजेंद्र जगताप, सर्व उपायुक्त तसेच विभागप्रमुखही बैठकीला उपस्थित होते.समितीच्या सदस्यांनी या वेळी प्रशासनावर बरेच तोंडसुख घेतले. आयुक्तांच्या अनुपस्थितीवरून मध्यंतरी दोन वेळा बैठक तहकूब करण्यात आली, तरीही त्याची दखल घेतली गेली नाही. याबाबत काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर आयुक्तांनी सर्व सदस्यांना आपापल्या प्रभागांतील महत्त्वाच्या कामांची यादी द्यावी, असे सुचविले. (प्रतिनिधी)
मिलाफासाठी ‘स्थायी’ प्रयत्न
By admin | Published: July 12, 2016 2:07 AM