पुणे - जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी महापालिका क्षेत्रात आधार केंद्रांची संख्या, मशीन्स यांची संख्या कमी आहे. जिल्हा प्रशासनाकडून आधार केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत. यापुर्वी काम केलेल्या खासगी कंपन्यांना शासकीय कार्यालयांमध्ये येऊन आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करण्यास परवानगी द्यावी असा प्रस्ताव युनिक आयडेंटीफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडीयाला (युआयडी) देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
पुरेशा आधार केंद्रांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांच्या क्षेत्रिय कार्यालयांसह जिल्ह्यातील मंडल स्तरावर आधार केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. राव यांनी युआयडीचे सहायक नोंदणी अधिकारी सुन्मय जोशी यांच्यासोबत नुकतीच बैठक घेतली. दोन्ही महापालिका क्षेत्रांमध्ये मिळून आधार यंत्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असून पुण्यासाठी १२५ तर पिंपरी चिंचवडसाठी ७० अशा १९५ आधार केंद्रांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत केवळ ८७ केंद्रच सुरु आहेत.
बैठकीमध्ये आधार कार्ड केंद्रांबाबत तसेच पुरेशी यंत्र उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. ज्या खासगी कंपन्या शासकीय कार्यालयांमध्ये येऊन शासकीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली काम करण्यास तयार असतील त्यांना परवानगी देण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हाधिका-यांनी ठेवला होता.
या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यास केंद्र आणि यंत्रांची संख्या वाढणार आहे. जोशी यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून दिवाळीपर्यंत शहरातील आधार केंद्र वाढतील असा विश्वास राव यांनी व्यक्त केला.