लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पेट्रोल-डिझेल यंत्रात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून हायटेक चोरी करणाऱ्या पेट्रोल पंपांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने आयोजित बायो एनर्जी ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल वितरण यंत्रात फेरफार करून इंधनचोरी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत विचारले असता, प्रधान म्हणाले, पेट्रोल-डिझेल पंपांची तपासणी राज्य सरकारच्या आखत्यारीत आहे. येथील पुरवठा विभागाशी आम्ही संपर्कात आहोत. या सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येईल. त्यात यंत्रात छेडछाड करुन इंधन चोरी करणाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील, असेही त्यांनी सांगितले. पेट्रोल-डिझेलमध्ये वीस टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण करता येऊ शकते. त्यासाठी वाहनांमध्ये फारसा बदलदेखील करावा लागणार नाही. इथेनॉलची गरज पाहता ती केवळ साखर कारखान्यांच्या माध्यमातून भागविता येणार नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रातील वाया जाणारे घटक, शहरातून निर्माण होणारा कचरा आणि मैलापाण्याच्या माध्यमातून ही गरज भागविण्यात येईल. त्यासाठीच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणार आहे. महाराष्ट्रातही टू-जी इथेनॉल प्लांट इथेनॉलची वाढती गरज भागविण्यासाठी केवळ साखर कारखानदारीवर अवलंबून राहता येणार नाही. भात, ज्वारी या पिकांपासून तयार होणारे टाकाऊ पदार्थ आणि शहरातून निर्माण होणारा कचरा, यातून इंधननिर्मिती करण्यात येईल. हे ‘सेकंड जनरेशन’ इंधन बनविण्यासाठी देशभरातील १२ ठिकाणी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
पेट्रोलचोरी करणाऱ्या पंपांचे परवाने होणार रद्द
By admin | Published: July 08, 2017 4:52 AM