पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये खासगी क्लासेसना लागलेले टाळे तब्बल नऊ महिन्यांनंतर उघडण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून खासगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली असून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद करण्यात आली होती. हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. व्यापारासह सार्वजनिक व्यवहारांवर असलेले निर्बंध हळूहळू उठविण्यात आले. काही दिवसांपुर्वीच शाळा आणि महाविद्यालये उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या आॅनलाईन शाळा सुरु होत्या. त्या अद्यापही सुरु आहेत. शिकवण्या सुरु करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे शिकवण्यांवर अवलंबून असलेल्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.
शाळा सुरु झाल्यानंतर आता पालिकेने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत खासगी शिकवण्या सुरु करण्यास परवानगी दिल्याची माहिती पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली. शिकवण्या सुरु करताना सुरक्षित अंतर राखण्याचे निकष पाळले जावेत असे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे. यासोबतच शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून शिकवणीमध्ये थर्मल गन आणि आॅक्सिमीटरद्वारे दैनंदिन तपासणी करणेही बंधनकारक आहे. या शिकवण्यांची पालिकेच्या अधिका-यांकडून अचानक तपासणी केली जाणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.
====
काय घ्यावी लागणार काळजी?
* सुरक्षित अंतर राखावे लागणार.
* शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक.
* थर्मल गन व आॅक्सिमीटरद्वारे तपासणी आवश्यक.