पुणे : योग्य तो समन्वय ठेवून सर्वांना आवश्यक त्या सुचनांचे पालन करण्याचे केलेले आवाहन आणि सर्व पक्ष, संघटनांना यांनी या आवाहनाला मान देऊन ठरवून दिलेल्या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता आजचा भारत बंद शांततेत पार पडला, त्यामुळे कोणतीही कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली नाही, असे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
खासगी गाड्या अथवा एसटी बसगाड्यांवर दगडफेक होणे, दुकाने जबरदस्तीने बंद करायला लावणे, असे कोणताही अनुचित प्रकार न होता मंगळवारचा ‘भारत बंद’ पुणे शहरात शांततेत पार पडला.
डॉ. शिसवे यांनी सांगितले की, गेले २ दिवसांपासून पुणे शहरातील ३० पोलीस ठाण्यातील अधिकारी त्यांच्या भागात कोण आंदोलन करणार आहे, त्यांच्याशी समन्वय ठेवून होते. आंदोलकांनी मोर्चा काढण्याची मागणी केली होती. त्यांना मोर्चाला परवानगी देता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर सोमवारी रात्री आंदोलक संघटना आणि पोलिस यांची बैठक घेण्यात आली.
आंदोलकांनी अलका टॉकीजजवळील टिळक चौकात निदर्शनास परवानगी मागितली व मोर्चा काढणार नसल्याने लिहून दिले. त्यानुसार आंदोलकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास पोलिसांनी सहमती दिली. या निदर्शनामुळे वाहतूकीला कोणताही अडथळा होणार नाही, यादृष्टीने खबरदारी घेण्यात आली. याशिवाय मार्केटयार्ड, कोंढवा अशा ६ ठिकाणी आंदोलकांनी निदर्शने केली. सकाळपासून सर्व पोलीस आयुक्त आपल्या हद्दीत गस्त घालून बंदोबस्ताची पाहणी करीत होते.