भीमाशंकर अभयारण्या क्षेत्रातून डिंभे ते आहुपे या ५१ किलोमीटर रस्त्यांपैकी पाटण, पिंपरगणे ते आहुपे हा साडेतेरा किलोमीटरचा रस्ता गेला आहे. रस्त्यावर आहुपे, पिंपरगणे, पाटण, डोण, नानवडे, नाव्हेड, आघाणे, बालविरवाडी, कापुरवाडी इत्यादी गावे व वाड्यावस्त्या येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, परवानगी नसल्याने हे काम वन्यजिव विभागाने मागिल एक वर्षापुर्वी बंद पाडले. आहुपे परिसरातील वरिल गावांना जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने या खराब रस्त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल सुरू झाले.
वन्यजिव विभागाने रस्त्याचे काम बंद पाडल्यानंतर पंचायत समिती सभापती संजय गवारी व परिसरातील ग्रामस्थांनी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ही फिर्याद मांडली. त्यांनी मुंबईत वन्यजिव विभागाच्या अधिकऱ्यांशी वेळोळवेळी बैठका घेवून या रस्त्याच्या परवानगी झाली प्रयत्न सुरू केले. एकुण १३.६०० किलोमीटर पैकी ९.९७९ किलोमीटर खाजगी क्षेत्रातून तर ३.६२१ किलोमीटर वनक्षेत्रातून जातो. हा रस्ता अभयारण्य घोषीत होण्यापुर्वीचा आहे, याचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला. शेवटी दि.१८ डिसेंबर २०२० रोजी वन्यजिव विभागाचे प्रधानमुख्य वनसरंक्षक नितीन काकोडकर यांनी या रस्त्यास काही अटी व शर्तीसह परवानगी दिली आहे.
यामध्ये रस्त्याचे काम करताना कोणतेही झाड तोडाता येणार नाही, रस्ता अतित्वातील रूंदी मध्ये केला जावा. डांबरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे डांबराचे मिश्रण वन्यजिव विभागाच्या हद्दी बाहेर तयार करावे. जर हद्दीत तयार करायचे असेल तर उपवनसरंक्षक यांची परवानगी घ्यावी. वन्यजिव विभागाच्या हद्दीत रस्ता करताना वळण सरळ करता येणार नाहीत. जंगली प्राण्यांना वहानांची धडक बसू नये यासाठी स्पीडब्रेकर व स्पीड नियंत्रीत करणारे फलक ठिकठिकाणी बसवावेत. रस्त्याच्या बाजुला गटर व पाणी जाण्याची व्यवस्था करावी. रस्त्याचे काम करताना कोणत्याही वन्यजिव अधिनियमाचे उल्लघन होणार नाही याची काळजी घ्यावी या अटी शर्ती टाकण्यात आल्या आहेत.
चौकट
राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घातल्याने या रस्त्यास परवानगी मिळू शकली. हा पक्का रस्ता व्हावा अशी अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांची मागणी होती. वन्यजिव विभागाने हा रस्ता आडवल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. परंतू परवानगी आल्याने आहुपे परिसरातील लोकांनी आनंद व्यक्त केले असून या रस्त्यामुळे आहुपे व परिसरातील गावांची वहातुकीची मोठी समस्या दुर होणार आहे, असे पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी सांगितले.