पिंपरी : केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे़ त्यामुळे शहरातील वाहतूक विभागाला वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडे सुटे पैसे नसल्यामुळे परवाना जमा करावा लागत आहे़ मंगळवारपासून चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद झाल्याने वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांची दंडाची रक्कम वसूल करताना मोठी पंचाइत झाली़ लायसन्स नसणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट नसणे, झेब्रा क्रॉसिंग या नियमांची पायमल्ली करणाऱ्या अनेकांना दोनशे रुपयांची दंडाची पावती करण्यात आली़ मात्र, अनेकांनी दंड भरण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला़ त्यामुळे शहरातील विविध भागातील वाहतूक कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांचे लायसन्स जमा करून घेतले़ त्यांना दंडाची रक्कम दहा दिवसांच्या आत भरणे बंधनकारक आहे़ जर ही रक्कम वेळेत भरली नाही, तर त्यांचे लायसन्स कोर्टात जमा करण्यात येणार आहे़ शहरातील पिंपरी, निगडी, भोसरी, हिंजवडी, चतु:शृंगी, चिंचवड हद्दीतील वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमन करताना वाहनचालकाने तोडलेल्या नियमाबद्दल सुट्या पैशांची मागणी करताना नाकी नऊ आले़ दंड भरण्यासाठी अनेक वाहनचालक हजार आणि पाचशेच्या नोटा देत होते़ त्या नोटा चलनातून बंद झाल्याचे सांगत असताना कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यामध्ये तू-तू मैं-मैं झाल्याचे चित्र दिसून आले़ काही कर्मचाऱ्यांनी तर वाहतूक नियम तोडणाऱ्यांना अरे बाबा पाचशे नको सुटे दोनशे रुपये दे अशी विनवणी केली़ शहरातील बहुतांश भागात रस्त्यांवर वाहतूक शाखेचे कर्मचारी काम करीत होते़ मात्र, वाहनचालकांना माहिती देण्यात त्यांचा अधिक वेळ वाया जात होता़ वाहनचालकांनी प्रामाणिकपणे दंडाची रक्कम हजार व पाचशेच्या नोटा कर्मचाऱ्यांच्या हातात दिल्या. मात्र, सुट्या पैशांचा वाद वाढल्याने नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
दंडाच्या रकमेऐवजी परवाने जप्त
By admin | Published: November 10, 2016 1:26 AM