दावडी : भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर शेतकऱ्यांनी फेकल्याचे आपण ऐकले आहे; परंतु प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळाला असून मांजरेवाडी (ता खेड ) येथील अरविंद मांजरे या शेतकऱ्यांने पिकविलेल्या टोमॅटोला आतापर्यंत १५०० कॅरेटमधून १५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
दोन महिन्यापूर्वी भाजीपाल्यातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. काही शेतकऱ्यांनी पुढील भाजीपाला पिकांच्या बाजारभावाचा विचार न करता भाजीपाला पिके घेतली त्यांना नशिबाने साथ दिली अन् आज ते लखपती झाले आहेत. एप्रिल, मे महिन्यात लागवड केलेले टोमॅटो बहुतेक वेळा करपा व इतर रोगांनी नष्ट होतात. या संकटांवर मात करून खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्म ) येथील शेतकरी अरविंद मांजरे यांनी एक एकरावर टोमॅटोची लागवड केली. त्यावेळी टोमॅटो दोन-तीन रुपये किलोने विकले जात होते. पुढील भावाचा विचार न करता या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. सुरुवातीला कमी भाव मिळाला पण नंतर मात्र त्यांना नशिबाने साथ दिली. एक एकरात टोमॅटोला दीड लाखापर्यंत खर्च केलेला असताना आजपर्यंत त्यांना १५ लाखांचे उत्पन्न मिळाले. सुरुवातीला पंधरासे ते सतरासे रुपये दर मिळाला. तो पुढे वाढत वाढत जाऊन दोन हजार रुपये कॅरेटपर्यंत मिळाला. आतापर्यंत पंधरासे कॅरेटचे उत्पादन निघाले.
''सुरुवातीला एप्रिल महिन्यात टोमॅटोची लागवड केली. त्यावेळेस उन्हाचा कडाका यातून टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात खर्च करून वाढविले. त्यावेळेस थोडया शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती. परंतु पुढचा बाजारभावाचा विचार करता टोमॅटो पीक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज मात्र त्याच टोमॅटो पिकातून चार पैसे पदरात पाडून दिले आहे.- अरविंद मांजरे (शेतकरी मांजरेवाडी ता. खेड)''