पुणे: खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी (एनडीए)मध्ये तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर कॅडेट सागरासारख्या माेठ्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे कॅडेट्सनी अनुभव, माेकळेपणा, करुणा, भावनिक बुध्दिमत्ता, अनुकूल नेतृत्व हे गुण आत्मसात करावे. जीवनात अपयशाने खचून न जाता, कठीण परिश्रमाबरोबरच जिद्द, सातत्य ठेवल्यास सर्व गाेष्टींवर यशस्वीपणे मात करता येऊ शकेल असे मत इंदाैर येथील इंडियन इन्स्टियूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) संचालक हिमांशू राय यांनी साेमवारी व्यक्त केले.
एनडीए मध्ये साेमवारी १४४ वा दीक्षांत समाराेह पार पडला. यावेळी विविध अभ्यासक्रमाच्या शाखेतील एकूण ३६७ कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी एनडीएचे कमांडंट व्हाईस अॅडमिरल अजय काेचर, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल संजीव डाेगरा, प्राचार्य प्रा. ओम शुक्ला यांची व्यासपीठावर उपस्थिती हाेती. यावेळी बीएस्सीचे ८१, बीएस्सी काॅम्प्युटर सायन्सचे ९०, बीए चे ५९ आणि बीटेकच्या १३७ अशा एकूण ३६७ कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये भारताच्या मित्र देशांतील १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कॅडेट्स मध्ये प्रशिक्षणानंतर राष्ट्रीयत्वाची भावना ओतप्रोत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेले करिअर हे देशाच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे त्यांनी पुढील काळात जबाबदारीपूर्वक देशसेवा करावी. देश आपल्याकडे माेठ्या आकांक्षेने पाहत असून सैनिक हाेणे साेपी गाेष्ट नसून, माेठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. लष्करी सेवेत विविध परिस्थितीत काम करावे लागत असते तसेच वेगवेगळया आव्हानांचा सामना करावा लागताे. त्यामुळे शिस्त बाळगत आपले युनिट एकत्रित बांधून ठेऊन काम करणे महत्वपूर्ण आहे. काेणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने देशसेवा करणे सैनिकांचे कर्तव्य असल्याचे मत एनडीचे कमांडट अजय काेचर यांनी व्यक्त केले.