पुणे : संस्थेने कारवाई केलेल्या शिक्षकाच्या अर्जावर अनुकूल शेरा देऊन कारवाई करु नये, यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
निजाम हाजी नन्हुमिया शेख (वय ३६, रा़ हिल व्ह्यु, हांडेवाडी, हडपसर) असे या संशोधन सहायकाचे नाव आहे. तक्रारदार हे प्रथितयश संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या संस्थेने शिक्षकांवर कारवाई केली आहे़ संबंधित शिक्षकाने प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयात संस्थेची राईट टू एज्युकेशन (आरटीई) मान्यता रद्द करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर कारवाई सुरु होती़ संबधित शिक्षकाच्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी व आरटीई मान्यतेसाठी संस्थेस अनुकूल शेरे देण्यासाठी शेख याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर ३० जानेवारीला सेंट्रल बिल्डिंग येथील आवारात सापळा लावण्यात आला़ तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताना शेख याला पकडण्यात आले़ बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.