युगंधर ताजणे
पुणे : सगळं काही व्यवस्थित सुरु असताना कधी कुणाला काय सुचेल आणि त्यातून पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळेल याचा भरवसा नाही. आयटीतील नोकरी सोडून पुढे जगभर शांतता आणि मानवतेचा प्रचार, प्रसार करण्याची तीव इच्छा कोकणात जन्माला आलेल्या आणि मुंबईत आयुष्य घालवलेल्या योगेश माथुरिया यांची होती. ती मोठ्या जिद्दीने प्रत्यक्षात त्यांनी आणली. त्याच्या जोरावरच त्यांनी गेल्या पाच वर्षात 18 राज्ये पादाक्रांत तर केली. याशिवाय श्रीलंका आणि आफ्रीकेत देखील पायी फिरुन तिथे शांतीच्या मार्गाने जीवन व्यतीत करुन मानवतेची मुल्यांचे पालन करा. असा संदेश त्यांनी दिला. येत्या 12 जानेवारीला पुणे-बांग्लादेश प्रवासाला ते निघणार आहेत.
योगेश माथुरीया आता 61 वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या शांततामय संदेशाच्या प्रसार कार्याला घरातून पाठींबा आहे. त्यांच्या दोन्ही मुली साक्षी आणि भूमी यापैकी साक्षीने आफ्रीकेतील प्रवासात त्यांना साथ केली आहे. माथुरिया यांचे वडिल रवींद्र हे 91 वर्षांचे असून या वयात देखील ते योगासने, पोहणे आणि चालण्यात तरबेज आहेत. हाच वारसा योगेश यांनी सुरु ठेवला आहे. खरे तर 9 वर्षाचे असताना सतीशकुमार आणि आणि मेनन वडिलांच्या या दोन्ही मित्रांचे ‘‘ बिना पैसे दुनिया की पैदल सफर’’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन होते. त्यात त्यांनी गांधीजी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांना आदर्श मानुन ते जगभर पोहचविण्याचे ध्येय मनाशी बाळगले. ते पुढे ते प्रत्यक्षात आणले. मुंबईत आयटी क्षेत्रात नोकरी केल्यानंतर माथुरिया यांना दररोजच्या ‘‘तेच ते’’ पठडीतले काम करुन आलेल्या नैराश्यावर प्रभावी उपाय म्हणून भ्रमंती करण्याची कल्पना सतीशकुमार यांच्या कानावर घातली. त्यांनी ‘‘भारत के कोने कोने मे जाओ’’ असा संदेश दिला. तो प्रमाण त्यांनी पदयात्रेला सुरुवात केली. 2013-14 दरम्यान पहिल्यांदा पाकिस्तानचा पायी दौरा करावा असे माथुरिया यांनी ठरवले. अहमदाबादवरुन ते थेट वाघा बॉर्डरला पोहचले. मात्र व्हिसा आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला.
तीर्थयात्रा आणि आरोग्यसेवेसाठी जीवन समर्पित करायचे असे ठरवून अधिकधिक युवकांपर्यत पोहचून त्यांना शांतता, प्रेम आणि मानवतेची मुल्ये समजावून सांगण्याचे काम ते करतात. यात कुठल्याही प्रकारचा धार्मिक,जातीय प्रकारचा भेदभाव नसावा यावर त्यांचा मुख्य भर आहे. याकरिता सुरुवातीला 29 मार्च 2013 ला मुंबई ते अहमदाबाद ‘‘पीसवॉक’’ सुरु झाला. हे अंतर त्यांनी अवघ्या 19 दिवसांत त्यांनी पूर्ण केले. 21 सप्टेंबर या शांती दिनाच्यानिमित्ताने त्यांनी मुंबई ते पुणे हे अंतर पूर्ण केले. विशेष म्हणजे 2017 मध्ये दोनवेळा हदयविकाराचे झटके आले असताना देखील जिद्दीच्या बळावर आपले ध्येय पूर्ण केले. माथुरिया यांनी आतापर्यंत 12 हजार 676 किमी अंतर 419 दिवसांमध्ये पूर्ण केले आहे. यात आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे 5 वर्षांपासून त्यांच्याजवळ दमडीही नसताना 18 राज्ये, श्रीलंका व द.आफ्रीका येथे पायपीट करुन ’’शांतता-मानवतेचा संदेश’’ देण्यात समाधान मानले आहे.
देऊळ,मशिद,चर्च, जिथे जागा मिळेल तिथे झोपलो...
आपण करीत असलेले काम हे अखंड मानवतेला प्रेम आणि समाधान देणारे असल्याने आजवर कुठल्याही प्रकारचे संकट ध्येयाच्या आड आले नाही. आफ्रीकेत ज्यावेळी पत्रकार परिषद झाली तेव्हा तेथील पत्रकारांनी आम्हाला वेडे ठरवले. तुम्ही पुन्हा तुमच्या मायदेशी जा. असे त्यांनी सांगितले. मात्र थोड्याच दिवसांत तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यात कुठलीही अडचण आली नाही. पाच दिवस आफ्रीकेतील जेलमध्ये झोपलो होतो. तर भारतातील 18 राज्ये फिरताना मंदिरे, चर्च, मशीद, आश्रमशाळा जिथे जागा मिळेल तिथे झोपलो. मात्र त्यामुळे ना काही त्रास झाला ना काही संकट आले. अशी भावना योगेश माथुरिया व्यक्त करतात.
भाषेची अडचण होती...
जगभर फिरुन देखील माणूसकीची मुळ तत्वे काही बदलत नाहीत. असा प्रत्यय आतापर्यंतच्या पदयात्रेतून आला आहे. तुमचे ध्येय योग्य असेल त्यातून समाजाचे भले होणार असेल तर तुम्हाला समाजातून हवे ते सहकार्य मिळते. असा माझा विश्वास आहे. माझ्याबरोबर माझे सहकारी देखील पूर्ण सेवाभावी वृत्तीने यात सहभागी होतात. याचे समाधान वाटते. भ्रमंतीच्या निमित्ताने फिरताना संवादाकरिता भाषेची उणीव जाणवली. मात्र विविध ठिकाणचे नागरिक कमालीचे प्रेमळ व सहकार्यशील असल्याने तो प्रश्न मार्गी लागत असल्याची आठवण माथुरिया सांगतात.