पुणे : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करुन त्याचे फोटो स्टेट्सवर ठेवणारे दोन तरुण आणि त्या तलवारी बनविणारा लोहार अशा तिघांना दत्तवाडी पोलिसांनीअटक केली आहे.रितेश बाळु पायके (वय १९), आदित्य संजय नलावडे (वय १९, दोघे रा. जनता वसाहत) आणि प्रेम योगेश पवार (वय २४, रा. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.शहरात टोळक्यांचा सध्या नंगानाच सुरु आहे. खुन झालेल्या गुंडाचे वाढदिवस पिस्तुल आणि कोयते हवेत नाचवत साजरे केले जात आहे. तलवारी, कोयत्यांनी भर रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरे होत आहेत. त्याचे फोटो व्हॉटसअपवर टाकून परिसरात आपली दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अमंलदार विष्णु सुतार, शरद राऊत व राहुल ओलेकर यांना माहिती मिळाली की, काही दिवसांपूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करुन त्यांचे फोटो व्हॉटसअप स्टेटस ठेवले होते. हे फोटो स्टेटसला ठेवून दहशत निर्माण करणारे दोघे जनता वसाहतीत आले असून त्यांच्याकडे हत्यारे आहेत. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याकडून तलवारीदेखील जप्त केल्या. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी या तलवारी त्यांच्या ओळखीच्या भोरमधील लोहार प्रेम पवार याने तयार करुन दिल्याचे सांगितले. तसेच तो आणखी तलवारी देण्यासाठी जनता वसाहतीत आल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करुन लोहार प्रेम पवार याला अटक केली. त्यांच्याकडून एकूण ७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.रितेश पायके आणि आदित्य नलावडे हे जनता वसाहतीत रहायला असून त्यांना परिसरात दहशत निर्माण करावयाची असल्याने त्यांनी रितेश पायके याचा महिन्यापूर्वी जनता वसाहत डोंगराच्या बाजुला तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. त्याचे फोटो काढून व्हॉटसअप व इतर सोशल मिडियावर लोड केले होते. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, शिवाजी क्षीरसागर, अमित सुर्वे, विष्णु सुतार, शरद राऊत, राहुल ओलेकर, भरत आस्मर, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले यांच्या पथकाने केली आहे.
तलवारीने केक कापून त्याचे फोटो स्टेट्सला ठेवणाऱ्याला अटक; तलवारी बनविणारा लोहारही जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 10:32 PM