पुणे : अनेकजण विविध छंद जाेपासत असतात. काेणी जुनी नाणी गाेळा करतात तर काेणी एसटी बसेसची तिकीटे गाेळा करण्याचा छंद जाेपासतात. असाच एक अवलिया असून त्याने काडीपेट्या जमविण्याचा छंद जाेपासला आहे. केवळ छंदच नाहीतर देशविदेशातील पस्तीस हजारांहून अधिक काडीपेट्यांचा संग्रह या अवलियाकडे असून या काडीपेट्यांचे पुण्यातील बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
विनायक जाेशी असे या अवलियाचे नाव आहे. जाेशी यांनी भारतातीलच नाही तर जगभरातील काडीपेट्यांचा संग्रह केला आहे. यात छाेट्या काडीपेट्यांपासून माेठमाेठाल्या काडीपेट्यांचा समावेश आहे. त्याचबराेबर हजाराे बाॅटल ओपनर देखील त्यांनी जमवली असून ती सुद्धा प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. इतक्या विविध पद्धतीच्या काडीपेट्या पाहून नागरिकही हरखून जात आहेत. या काडीपेट्यांमध्ये जाेशी यांनी विविध प्रकार केले असून त्यापद्धतीने त्याची मांडणी करण्यात आली आहे. यातील अनेक काडीपेट्या या दुर्मिळ असून सध्या कुठेही उपलब्ध नाहीत.
याविषयी बाेलताना जाेशी म्हणाले, माझा काडीपेट्या गाेळा करण्याचा छंद आहे. 25 वर्षापूर्वी मी व्यवसायानिमित्त गुजरातला जात असे, तेथे मला विविध पद्धतीच्या काडीपेट्या मिळत असत. माझ्या मुलाने रस्त्यावरच्या काडीपेट्या जमविण्यास सुरुवात केली हाेती. पुढे मी ताे छंद जाेपासला. आज माझ्याकडे 35 हजाराहून अधिक काडीपेट्यांचा संग्रह आहे. यात भारताबराेबर जगभरातील काडीपेट्या आहेत. विविध आकाराच्या काडीपेट्यांचा यात समावेश आहे. या काडीपेट्यांचे वर्गीकरण मी केले. हे माझे चाैथे प्रदर्शन आहे. आजच्या मुलांना छंद नसतात, माेबाईलच्या बाहेर ते येत नाहीत. त्यामुळे या प्रदर्शनातून लहान मुलांना छंदाची गाेडी निर्माण व्हावी या हेतूने हे प्रदर्शन आयाेजित केले आहे.