पुणे : मुंबई पोलिस भरती २०२१ च्या लेखी परिक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याप्रकरणी अटक केलेल्याने पुण्यात झालेल्या लोकसेवा आयोगाच्या अव्वल कारकून पूर्वपरीक्षेचा पेपर फोडल्याचे निष्पन्न झाले आहे. स्पाय कॅमेऱ्याद्वारे पेपरफुटी प्रकरणी त्यामुळे तब्बल ५ महिन्यांनंतर लोकसेवा आयोगाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत लोकसेवा आयोगाच्या दक्षता अधिकारी सुप्रिया लाकडे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश भाऊ सिंग घुनावत (वय २७, रा. राजेवाडी, पो. केळी धावण, ता. बदनापूर, जि. जालना), जीवन नायमाने आणि शंकर चैनसिंग जारवाल (वय ३०, जि. जालना) अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील जे एस पी एम जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे ३० एप्रिल रोजी सकाळी घडला होता.
विविध अराजपत्रित गट ब व गट क या पदभरतीसाठी पुण्यासह राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावर ३० एप्रिल २०२३ रोजी पूर्व परिक्षा घेण्यात आली होती. मुंबई पोलिस भरती २०२१ ची लेखी परिक्षेदरमयान गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाल्याने मुंबई पोलिसांनी शंकर जारवाल याला अटक केली होती. त्याच्या मोबाईलच्या गॅलरीचे तांत्रिक विश्लेषणात केले त्यात पुण्यातील या परिक्षेमध्ये स्पाय कॅमेरा वापरुन आकाश सिंग याने जीवन नायमाने याला प्रश्नप्रत्रिका पाठविली होती. जीवन नायमाने ही प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका शंकर जारवाल याच्या मोबाईलवर पाठविल्याचे निष्पन्न झाले होते.
ज्या मोबाईलवरुन ही प्रश्न पत्रिका पाठविली गेली. त्याबाबत लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरील प्रोफाईल, परिक्षेचा हॉल तिकीट व उमेदवाराचा तपशील पाहिल्यावर तो आकाशसिंग याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आयोगाच्या वतीने नवी मुंबई पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. हा प्रकार वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने नवी मुंबई पोलिसांनी तो वानवडी पोलिसांकडे वर्ग केला असून पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करीत आहेत.