पुणे : कचऱ्यावर गाणं रचत स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारा स्वच्छता कर्मचारी आता थेट पुणे महानगरपालिकेचा स्वच्छ पुणे अभियानाचे स्वच्छता दूत हाेण्याची शक्यता आहे. याबाबत विचार सुरु असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी कचऱ्यावर गाणं तयार करणाऱ्या महादेव जाधव यांचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरला झाला. त्यानंतर ते क्षणार्धात प्रसिद्धी झाेकात आले. त्यांनी रचलेल्या गाण्याचे काैतुक सर्वांनीच केले. त्यानंतर त्यांचे अनेक सत्कार देखील झाले. आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहून कचऱ्यावर कवनं रचत ते स्वच्छतेबाबत जनजागृती ते करतात. त्यांची हीच कला पाहून आता पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छ पुणे अभियानाचे स्वच्छता दूत म्हणून जाधव यांच्या नावाचा विचार सध्या केला जात आहे. त्यांना स्वच्छता दूत केल्यास त्यांच्या कामाची प्रेरणा घेऊन इतर कर्मचारी देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेतील असे पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटते. आधी स्वच्छता दूत साठी अनेक अभिनेत्यांना पाचारण केले जायचे. त्यांना माेठ्याप्रमाणावर खर्च देखील येत असे.
ज्ञानेश्वर माेळक म्हणाले, महादेव जाधव यांचे काम लक्षात घेऊन त्यांना स्वच्छता दूत करण्याचा विचार आहे. याबाबत मात्र अंतिम निर्णय घेतलेला नाही. लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
जाधव हे पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी असून त्यांनी कचऱ्यावर अनेक कवने रचली आहेत. त्यांच्या नवनवीन गाण्यांमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती हाेण्यास देखील मदत हाेत आहे. त्यांची गाणी ऐकुण एक तरूण दिग्दर्शक अक्षय कदम हे दीड वर्षांपूर्वी महादेव यांना शोधत आले व त्यांनी त्या घेवून लोक जागृतीसाठी लघुपट बनविण्याचे ठरविले. प्रवास सुरू झाला महादेवाचा खरा “अभिनेता” होण्याचा. त्यांचा “लक्षुमी” या लघुपटाला सोमवारी झालेल्या आण्णाभाऊ साठे राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.