पुणे ः हाॅर्न प्लिज असे माेठमाेठाल्या ट्रक, ट्राॅलीच्या मागे लिहीलेले असते. हे वाक्य काही लाेक इतक्या सिरिअसली घेतात की त्याचा उपयाेग ते सातत्याने करत असतात. विनाकारण हाॅर्न वाजविल्याने माेठ्याप्रमाणावर ध्वनिप्रदूषण हाेत असते. 2018 साली राष्ट्रीय स्तरावर केलेल्या एका सर्वेमध्ये पुण्यात भारतातील सर्वात जास्त ध्वनीप्रदूषण हाेत असल्याचे समाेर आले आहे. परंतु याच पुण्यात असा एक अवलिया आहे की ज्यांनी गेल्या सहा महिन्यात केवळ एकदाच हाॅर्न वाजविला आहे.
अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी पुण्यात लाईफ सेविंग फाऊंडेशन ही संस्था काम करते. या संस्थेच्या मार्फत नुकताच नाे हाॅर्न डे राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील विविध चाैकांमध्ये जनजागृती करण्यात आली. याच संस्थेच्या देवेंद्र पाठक यांनी गेल्या सहा महिन्यात एकदाच हाॅर्न वाजविला आहे. पाठक यांना मिझाेरामच्या राजधानीत काेणीच हाॅर्न वाजवित नसल्याचा अनुभव आला. त्यावर अशी चळवळ पुण्यात राबविण्यात येऊ शकते का याची त्यांनी चाचपणी केली. त्यासाठी त्यांनी स्वतःवर प्रयाेग करण्याचे ठरविले.
पाठक यांनी गरज नसताना हाॅर्न न वाजविण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी हा प्रयाेग केला असता त्यांना गेल्या सहा महिन्यात केवळ एकदा हाॅर्न वाजविण्याची गरज भासली. विशेष म्हणजे पाठक हे कारने राेज 40 ते 50 किलाेमीटरचा प्रवास करतात. शहरातील गर्दीच्या ठिकाणी सुद्दा त्यांना हाॅर्न वाजविण्याची गरज भासली नाही. हाॅर्न न वाजविताही ते वेळेत कार्यलायत पाेहचतात. हाॅर्न वाजवून वाहन चालविल्याने तसेच हाॅर्न न वाजवून वाहन चालविल्याने फारसा फरक पडत नसल्याचे पाठक यांचे म्हणणे आहे. हाॅर्न न वाजविण्याचे अनेक फायदे असल्याचे ते म्हणतात. हाॅर्न वाजवला आणि समाेरचे वाहन न हलल्यास किंवा साईड न दिल्यास आपले ब्लड प्रेशर वाढते, तसेच इतर मानसिक तणाव सुद्धा येतात. त्या उलट हाॅर्न न वाजविता वाहन चालविल्यास या व्याधी टाळता येतात असे पाठक सांगतात.
हाॅर्न न वाजविण्याच्या त्यांच्या या चळवळीला अनेक लाेक जाेडले गेले असून आत्तापर्यंत 20 हजारांहून अधिक नागरिकांनी त्यांच्या या माेहिमेला पाठींबा दिला आहे.