येरवडा - कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पत्नीसह गेलेल्या व्यक्तीला डोस घेण्यापूर्वीच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले. येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे हा प्रकार नुकताच घडला आहे. प्रत्यक्षात दुसरा डोस घेण्यापूर्वीच त्याच व्यक्तीच्या व त्यांच्या पत्नीच्या नावावर गुजरात येथे दुसरा डोस घेतल्याची नोंद याठिकाणी मिळून आली आहे. त्यामुळे त्यांना आता दुसरा डोस मिळणार नसल्याचे संबंधित लसीकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसरा डोस न घेता प्रत्यक्षात नोंदणीत लस घेतल्याची शहरातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. यासंदर्भात पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, "सदर व्यक्तीला पुणे महापालिकेच्या वतीने लसीचा दुसरा डोस देण्यात येईल. तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली असेल, त्यांचा दुसरा मोबाईल नंबर नोंद करून त्यांना दुसरी लस देण्यात येईल.पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे" असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.मात्र प्रत्यक्षात या घटनेमुळे सदर व्यक्तीच्या आधारकार्ड अथवा गोपनीय माहितीचा इतर ठिकाणी गैरवापर होऊ नये यासाठी संबंधित व्यक्ती पुणे महापालिका तसेच पुणे शहर पोलीस यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहेत.
या घटनेत सदर व्यक्ती व त्यांची पत्नी यांनी पहिला डोस घेऊन कालावधी पूर्ण झाला होता. त्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी येरवडा लक्ष्मी नगर येथील उर्दू शाळा येथे ते गेले होते. दरम्यान या ठिकाणी गेल्यावर दुसऱ्या लसीकरणासाठी नोंद करत असताना प्रत्यक्ष लस घेण्यापुर्वीच दुसरी लस घेतल्याची माहिती समोर आली. गुजरात येथे एका लसीकरण केंद्रात ते आणि त्यांची पत्नी या दोघांच्या नावाची दुसऱ्या लसीची नोंद करण्यात आलेली होती. त्यामुळे प्रत्यक्षात दुसरी लस न घेता त्याची नोंद झाल्यामुळे त्यांना दुसरा डोस देण्यात आला नाही.
यासंदर्भात महापालिका लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, तांत्रिक अडचणीमुळे असा प्रकार घडला असावा मात्र संबंधितांना लसीचा दुसरा डोस नक्कीच देण्यात येईल. पुणे शहरातील अद्यापही लसीकरण न झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीचे दोन्ही डोस घ्यावेत असे आवाहन देखील यावेळी केले आहे. मात्र या घटनेमुळे मोबाईल क्रमांक व आधारकार्ड याचा दुरुपयोग होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्ती हे पुणे महापालिका तसेच पुणे शहर पोलीस यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.