पुणे : आनंदनगर येथील डोंगरे कुटुंबीयांचा ९ वर्षांचा मुलगा सार्थक याचा मृत्यू घरात केलेल्या औषधफवारणीमुळे (पेस्ट कंट्रोल) झाला की विषबाधेमुळे, याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही़ ससून रुग्णालयात सार्थकचे शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनाही त्याचे निदान होऊ शकले नाही़ त्यांनी व्हिसेरा रासायनिक पृथक्करणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविला असून, त्यांचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, डोंगरे यांचा दुसरा मुलगा साहिल (वय ११) यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ डोंगर पती-पत्नींना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की संदीप डोंगरे हे पत्नी जान्हवी व दोन मुलांसह आनंदनगरमधील सिद्धार्थ अपार्टमेंटमध्ये राहतात. संदीप हे तुळजा भवानी इंटरप्रायझेस येथे औषधफवारणीचे काम करतात़ घरात ढेकूण झाल्याने त्यांनी रविवारी रात्री औषधफवारणी केली आणि घर बंद करून ते विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते़ तेथून रात्री अडीच वाजता परत आले़ त्यांनी बाहेरून भेळ आणली होती़ ती खाऊन ते झोपी गेले़पहाटे अचानक या चौघांना उलट्या व जुलाबांचा त्रास सुरू झाला़ संदीप याांनी रुग्णालयात न जाता बाहेरून गोळ्या आणल्या़ सोमवारी सायंकाळी सार्थकला रक्ताची उलटी झाली तेव्हा त्यांनी घाबरून त्याला रुग्णालयात नेले़ तोपर्यंत तो अस्वस्थ झाल्याने डॉक्टरांनी त्याला ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले़ मात्र, ससूनमध्ये नेल्यानंतर तेथे त्याचा मृत्यू झाला़पोलीस उपनिरीक्षक जे़ एस़ मोहिते अधिक तपास करीत आहेत़भेळीचे नमुनेही तपासणीसाठीपोलिसांनी डोंगरे कुटुंबीयांनी खाल्लेल्या भेळीचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत़ सार्थकच्या व्हिसेराचा रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजणार असून प्राथमिक तपासणीत औषधफवारणीमुळे ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे़सार्थकचा मोठा भाऊ साहिल व संदीप यांनाही त्रास सुरू झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ संदीप यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले़; मात्र साहिलची प्रकृती अद्याप गंभीर आहे़
पेस्ट कंट्रोलमुळेच बालकाचा मृत्यू, आनंदनगरमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 3:12 AM