पुणे : कीटकजन्य आजारांपासून पुणेकरांचे संरक्षण करण्यासाठी महापालिकेकडून खरेदी केल्या जाणार्या कीटकनाशकांनीच महापालिकेची तिजोरी पोखरली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या दहा वर्षांत शासनाच्या दरांना हरताळ फासत मनमानी दराने कोट्यवधी रुपयांची औषधेखरेदी झाली असल्याचा प्रकार आज समोर आला आहे. गेल्या दहा वर्षांत महापालिकेने खरेदी केलेल्या या औषधांच्या किमतीचा अहवाल प्रशासनाने स्थायी समितीत सादर केल्यानंतर हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उजेडात आला आहे. शासनमान्य दरांना हरताळ फासत खासगी कंपन्यांकडून जादा दराने कीटक नाशक खरेदी करण्याचा प्रस्ताव डिसेंबर २०१३मध्ये स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. मात्र, या औषधांच्या किमती जादा असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर स्थायी समितीने ही खरेदी प्रक्रिया थांबविली होती. त्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतरही औषधांच्या किमतीत तफावत आढळून आल्याने स्थायी समितीने गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. तसेच, गेल्या दहा वर्षांत खरेदी करण्यात आलेल्या औषधांच्या किमतीचा अहवाल समितीसमोर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हा अहवाल आज स्थायी समितीत सादर करण्यात आला. त्यात २००३-०४पासून २०१३-१४पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या औषधांच्या किमतीची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती पाहता आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी कंपन्यांच्या घशात घातला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे खरेदीचे रॅकेट गेल्या दहा वर्षांपासून पालिकेची तिजोरी साफ करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)
कीटकनाशकांनी पोखरली पालिकेची तिजोरी
By admin | Published: May 14, 2014 5:43 AM