बंदी असतानाही कुत्र्यांना घेऊन फिरतात मालक; ज्येष्ठांमध्ये पसरली भीती
पुणे : वन विभागाने टेकड्यांवर पाळीव कुत्र्यांना बंदी घातली असतानाही अनेक ठिकाणी बिनधिक्कतपणे आणली जात आहेत. या कुत्र्यांमुळे लॅा काॅलेज टेकडीवर रविवारी कुत्र्यांच्या भांडणात एक नागरिक जखमी झाला. त्यामुळे टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांनी यावर काही तरी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
शहरातील टेकडीवर अनेकजण पाळीव कुत्र्यांना घेऊन फिरायला येतात. त्यामुळे इतर नागरिकांना त्या कुत्र्यांची भिती वाटते. म्हणून काही नागरिकांनी वन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी टेकडीवर कुत्र्यांना बंदी घातली होती. तसेच काही कुत्रा मालकांवर दंडही केला होता. तरी देखील टेकडीवर कुत्र्यांना फिरायला आणले जात आहे.
लॅा कॅालेज टेकडीवर रविवारी दोन कुत्रा मालक समोरासमोर आले होते. तेव्हा त्यांच्याकडील कुत्र्यांनी एकमेकांवर भुंकायला सुरवात केली. त्यानंतर एका कुत्र्याने दुसऱ्या मालकाच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे त्यांच्या हातामधून रक्त वाहू लागले. हा प्रकार पाहून तेथील फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
अनेकजण कुत्र्यांना मोकळे सोडतात. त्यामुळे ते पळताना इतरांना भीती वाटते. त्या कुत्रा मालकांना या विषयी बोलल्यावर ते उध्दट उत्तरे देतात. त्यामुळे टेकडीवर फिरायला यायचे की नाही, अशी समस्या ज्येष्ठ नागरिकांसमोर निर्माण झाली आहे.
——————————————-
आम्ही टेकडीवर फिरायला येतो. पण कुत्र्यांमुळे या ठिकाणी यायला भिती वाटत आहे. काही जण कुत्रे आणतात आणि विनाबेल्ट सोडून देतात. त्यातूनच आज दोन कुत्र्यांमध्ये एक जण जखमी झाला आहे. त्यामुळे यावर वन विभागाने कठोर कारवाई करायला हवी.
- ज्येष्ठ नागरिक, प्रत्यक्षदर्शी
—————————————————
टेकडीवर असा प्रकार झाला असेल, तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. वन विभागातर्फे गस्त वाढवून दंडही आकारण्यात येईल.
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, वन विभाग
==================