पिंपरी : पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या भावात गेल्या वीस वर्षांत ७१ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. तर, त्यातील लिटरमागे दहा ते बारा रुपयांहुन अधिक वाढ गेल्या सहा महिन्यात झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून इंधनाचे भाव आणि त्यावरील लावला जाणारा कर चर्चेत आहे. सरकारच्या गंगाजळीत झटपट वाढ करणारा घटक म्हणून, इंधनाकडे पाहिले जाते. प्रवासी आणि खासगी वाहनांसाठी आणि उद्योगांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणी सातत्याने वाढती आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार एक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून त्याकडे पाहते. उत्पन्न खर्चाच्या दुप्पट कर इंधनावर आकारला जात आहे. सरकारच्या तिजोरीत मोठी वाढ होत असल्याने केंद्र सरकार इंधनाला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणू इच्छित नाही. एप्रिल २००२ ते १४ मे २०२१ मधील इंधन दाराची तुलना केल्यास पेट्रोलच्या भावात ७१.७९ आणि डिझेलच्या भावात ७१.८९ रुपयांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२० पासून पेट्रोलच्या भावात १०.६६ आणि डिझेलच्या भावात १२.७२ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
------
पेट्रोल आणि डिझेलच्या भावात झालेल्या वाढीमुळे सामान्य नागरिकांबरोबरच व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोरोना काळात इतक्या मोठ्या प्रमाणात भाववाढ करणे म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. महागाईमुळे नागरीक देशोधडीला लागतील. सरकारने कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. संजय कुलकर्णी, बिजलीनगर
------
सततच्या भावाढीमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. इंधनाची भाववाढ झाल्यास इतर वस्तूंचे देखील भाव वाढतात. पेट्रोल आणि डिझेल अत्यावश्यक असल्याने त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बोजा नागरिकांच्या खिशावरच पडतो. इंधनाचे भाव कमी न केल्यास नागरिकांना आंदोलन करावे लागेल.
राजेंद्र वाकचौरे, पिंपरी चिंचवड
-----
वर्ष सा.पेट्रोल डिझेल
१ एप्रिल २००२ २६.५४ १६.५९
१ एप्रिल २०१० ४७.९३ ३८.१०
१ एप्रिल २०१३ ६८.३१ ४८.६३
२० नोव्हेंबर २०२१ ८७.६७ ७५.७१
१४ मे २०२१ ९८.३३ ८८.४३