पिंपरी : भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर अज्ञात तीन जणांनी पेट्रोलच्या बाटल्या फेकण्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पिंपळेगुरव येथे ही घटना घडली. यात कोणतीही वित्त किंवा मनुष्य हानी झालेली नाही. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील पेट्रोलपंपाजवळ माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे ‘चंद्ररंग’ डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास एका दुचाकी वाहनावरून तिघेजण आले, जगताप यांच्या कार्यालयासमोर थांबले. त्यातील दोघांनी कार्यालयाच्या दिशेने पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या. आणि त्यानंतर ते अज्ञात तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले. हल्यामागील कारणांचा तपास आणि गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
या घटनेनंतर ताडतीने पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता, त्यात एका गाडीवर तिघांनी येऊन बाटल्या फेकल्याचे फुटेज मध्ये दिसत आहे. तसेच आलेल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर काळे कासल्याचे दिसून आले. त्यानंतर सहाच्या सुमारास आयुक्त कृष्णप्रकाश यांनी घटनास्थळास भेट दिली आहे. तसेच शहरात नाकेबंदी केली आहे. तपासासाठी पाच पथके तयार केल्याचे पोलीसांनी सांगितले.