पुणे : वयाच्या १९ व्या वर्षापासून रिक्षा चालवायला लागलो. आज ७२ वर्षांचा आहे, पण अजूनही रिक्षा चालवतोच आहे. दोन मुली होत्या, त्यांना उच्च शिक्षण दिले. दोघींची लग्नं करून दिली. सगळे रिक्षावरच. माझ्यासाठी रिक्षा म्हणजे माझी लक्ष्मी आहे. अशी भावना विलास माटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
निमित्त होते, रिक्षा पंचायतीच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त पंचायतीचे कल्पक सरचिटणीस नितीन पवार यांनी सलग ५० वर्षे रिक्षा चालवणाऱ्या काही चालकांचा सत्कार केला. त्यांच्यापैकी विलास माटे यांचे हे अनुभव कथन.
पुण्यात रिक्षा चालवणे त्याहीवेळी कौशल्याचेच काम होते. आजही तसेच आहे. मात्र त्यावेळी वाहनांची गर्दी फार कमी होती. रिक्षा करणे हे फार प्रतिष्ठेचे समजले जात असे. खासगी दुचाकी असलेले लोक फार कमी होते, चारचाकी तर निवडक लोकांकडेच असे. त्यामुळे रस्त्यावर आम्हाला मोकळेपणाने गाडी चालवता येत होती. प्रवासीही फार चांगले मिळायचे. त्यातही मोठी नोकरी असलेले, अधिकारी असे असत. संपूर्ण कुटुंबाला कुठे लांब जायचे असेल तर त्यांच्यासाठी रिक्षा हे चांगले साधन होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आरटीओ यांची बरीच अरेरावी चालायची पण...
रिक्षा चालवण्याला फारशी प्रतिष्ठा नव्हती. याचे मला वाईट वाटायचे. सर्वच रिक्षाचालकांना वाटत असणार, पण त्याला इलाज नव्हता. कारण त्यावेळी तरी नोकरी वगैरे मिळत नसेल तर रिक्षा चालवणे हाच एकमेव पर्याय होता. सुरुवातीला संघटना वगैरे काहीही नव्हती. त्यामुळे वाहतूक पोलीस, आरटीओ यांची बरीच अरेरावी चालायची. आम्हाला ऐकून घ्यावे लागायचे. डॉ. बाबा आढाव यांनी २८ वर्षांपूर्वी संघटना सुरू केली. मी स्थापनेपासून संघटनेचे काम करतो. अनेक प्रश्न संघटनेमुळे मार्गी लागले असल्याचे ते म्हणाले.
रिक्षाबद्दल माझ्या मनात कायम कृतज्ञताच
बाबांमुळे नंतर या कामाची आवड निर्माण झाली. आज माझ्या कसबा पेठेत माझ्या रिक्षा संघटनेचे २०० सदस्य आहेत. ते व त्यांचे नातेवाईक मिळून आम्ही एक फंड चालवतो. त्यातून फक्त सदस्यांच्या नातेवाइकांनाच ३ टक्के दराने अडीअडचणीला कर्ज देतो. चांगला सुरू आहे हा फंड. हीसुद्धा रिक्षाचीच देणगी. ड्रायव्हर भाई, हिसाब नाही असे उपहासाने म्हणतात, पण मला सांगताना आनंद वाटतो की, रिक्षाने मलाच काय, अनेकांना सन्मार्गावर ठेवले. पाय कधीही वाकडा पडू दिला नाही. रिक्षाबद्दल माझ्या मनात कायम कृतज्ञताच आहे.