पुणे : पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरवाढीचा पुण्यातील वकिलांनी शुक्रवारी(दि.२६) अनोख्या पद्धतीने निषेध केला. न्यायालयाच्या आवारात चक्क सायकल वारी करत सर्व वकील दाखल झाले. सरकारला वाढत्या महागाईची चिंता नसल्याचे सांगत आपणच उपाय शोधण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे वकिलांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. पुणे शहरात पॉवर आणि स्पीड पेट्रोलचे भाव शंभरीपार पोहोचले आहेत. तर साध्या पेट्रोल साठी लिटरमागे जवळपास ९७ रुपये मोजावे लागत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातल्या वकिलांनी अनोखे निषेध केला आहे. या वकिलांनी आत चक्क सायकलवरुन न्यायालय गाठले. काळा कोट घालत या वकिलांनी सायकल स्वारी केली. पुण्यातले प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी यात पुढाकार घेतला होता.
यावेळी 'लोकमत'शी बोलताना सरोदे म्हणाले,” वाढते पेट्रोल-डिझेलचे भाव यावर सायकल चालवणे हा तोडगा असल्याचे मत व्यक्त केले. सामान्यांना कोणत्याही निर्णयात सरकार सामील करत नाही, आपल्यालाच काय तो उपाय शोधावा लागणार आहे. म्हणून आठवड्यातून एकदा तरी सायकल चालवावी. वाढती महागाई खिसा खाली करतेय, पण सरकारला त्याची चिंता नाही. आपणच आपले आर्थिक गणित जमवले पाहिजे."