पुणे : महापालिकेच्या अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडे असलेल्या अॅम्बेसिडर, इंडिका, इंडिगो, कोरोला, सियाझ आदी चारचाकी गाड्यांच्या पेट्रोल, डिझेलचा खर्च महापालिकेला आता परवडत आहे. त्यामुळे इंधानावरील खर्च कमी करण्यासाठी, महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्याकरिता आता टाटा नेक्सॉन कंपनीच्या ३८ इलेक्ट्रिक व्हेयिकल (ई मोटारी) भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.
पेट्रोल व डिझेलवरील वाहनाऐवजी टाटा नेक्सॉन ई मोटारीचा वापर झाल्यास, प्रत्येक मोटारीमागे सरासरी ४ हजार ६५५ रुपये बचत होणार आहे. त्यामुळे ३८ वाहनांमागे महापालिकेचे दरमहा १ लाख ७७ हजार रूपयांची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ यामुळे विना टेंडर (निविदा न काढता) पुढील आठ वर्षांचे दायित्व तसेच कंपनीसोबत करार करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
या इलेक्ट्रीक मोटारींमुळे पारंपारिक इंधन खर्चात बचत आणि पर्यावरणाची हानी कमी होण्यासही मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मे. एनर्जी इफिसिएन्सी लि. कडे महापालिकेने ई मोटारी भाडेतत्वावर पुरविण्यासाठी विचारणा केली होती. त्यानुसार मे. एनर्जी इफिसिएन्सी लि. ने महापालिकेला टाटा नेक्सॉन कंपनीच्या ई मोटारी चालकासह ८ वर्षे भाडेतत्वावर देण्याचे दरपत्रक दिल आहे़ तसेच ८ वर्षांनंतर करार संपल्यानंतर मोटारीच्या एमआरपीच्या ५ टक्के रक्कम भरल्यास त्या मोटारी महापालिकेलाच मालकी हक्काने देण्याचेही कंपनीच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. तसेच ३८ वाहनांसाठी चालकासह २३ कोटी २८ लाख ८८ हजार रुपये खर्च येणार असून तो ८ वर्षे टप्प्याटप्प्याने द्यायचा असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे़ मंगळवारी होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन याबाबतची पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.