पिंपरी (पुणे) : टाळेबंदीमुळे मालवाहतूक, पर्यटन, कॅब वाहतूक याला मोठा फटका बसला. त्यामुळे गेल्या वर्षभरात डिझेलची मागणी १२ आणि पेट्रोलची मागणी सात टक्क्यांनी घटली आहे. डिझेलची मागणी ९८ लाख ३३ हजार आणि पेट्रोलची मागणी २० लाख २४ हजार टनांनी घटली आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत आर्थिक वर्षात १ कोटी १८ लाख ५७ हजार टनांनी घट झाली आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. इंधनाच्या मागणीत प्रथमच इतकी घट झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. जवळपास दीड महिना देशातील व्यवहार ठप्प होते. विविध राज्यांनी जिल्हाबंदी अथवा जिल्हा अंतर्गत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते.
काहीकाळ आंतरराज्य वाहतूक बंद होती. त्यामुळे इंधनाच्या मागणीत मोठी घट झाली. टाळेबंदी उठविल्यानंतर फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ होऊ लागली. मार्चमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत इंधनाच्या मागणीत वाढ झाली. आता टाळेबंदी सुरू झाल्याने पुन्हा मागणी घटली आहे. पेट्रोल ॲण्ड डिझेल असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला म्हणाले, गेले वर्षभर टाळेबंदीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत मोठी घट झाली आहे.
मार्चमध्ये इंधन मागणी वाढली
मार्च २०२० च्या तुलनेत मार्च २०२१ मध्ये डिझेलचा खप ५६.५९ लाख टनावरून ७२.२३ लाख टनांवर गेला. पेट्रोलचा खपही २१.५५ लाख टनांवरून २७.३९ लाख टनांवर गेला. ही वाढ अनुक्रमे २७.६ आणि २७.१ टक्के आहे.