पुणे : पालेभाज्याच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत माेठी वाढ झाली आहे. पालेभाज्यांचे भाव शंभरीच्या वर गेले आहेत. विशेष म्हणजे श्रावण घेवडा, गवार, राजमा, डिंगरी या पालेभाज्यांचे दर पेट्राेल-डिझेलच्या वर गेले आहेत. त्या खालोखाल फ्लाॅवर, भेंडी, हिरवी मिरची ८० रुपये प्रतिकिलो भाव आहे. या महागाईत जीवन जगावे कसे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
भाव काय? (प्रतिकिलो)
श्रावण घेवडा १२०
डिंगरी १००
राजमा १००
गवार १००
फ्लाॅवर ८०
भेंडी ८०
टोमॅटो ४०
तरीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
पावसाळ्यात वाहतुकीदरम्यान भाज्या खराब होतात. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे मार्केट यार्ड बाजारात जागेवर भाज्या घेऊन येण्यासाठी वाहतुकीला जादा पैसे मोजावे लागत आहे. त्यातुलनेत शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, परिणामी बळीराजाच्या पदरात निराशाच येत आहे.
श्रावण घेवड्याने खाल्ला भाव
श्रावणात श्रावण घेवड्याने भाव खाल्ला असून, प्रतिकिलाे १२० रुपये माेजावे लागत आहे. त्याबरोबर गवार, भेंडी, फ्लाॅवर, हिरवी मिरची आदींचे दर प्रतिकिलाे ८० ते १००च्या घरात आहेत.
वाहतूक खर्च आणि पावसात भाज्या खराब होण्याच्या धाेक्यामुळे कधी कधी आणलेल्या भावातच माल ग्राहकांना द्यावा लागत आहे.
- विमल नेटके, किरकोळ व्यापारी
श्रावण असो की भाद्रपद. गेले तीन महिन्यांपासून पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत. आता तर १००च्या वर पालेभाज्यांचे दर गेले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणेच अवघड झाले आहे.
- मनीषा रणदिवे, गृहिणी