पुणे : आधी स्वस्त वाटणारे सीएनजी आता डिझेलच्या जवळ जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे सीएनजी, असाे वा पेट्रोल-डिझेल.महागाईच्या या काळात वाहन वापरणे आता अवघड झाले आहे. भारतातील देशांतर्गत उत्पादित गॅस भारतीय ग्राहकांच्या मागणीनुसार पुरेसा नाही. मागील वर्षात भारताची मागणी तिप्पट झाली आहे.
भारत गेल्या अनेक वर्षांपासून कतार, मस्कत आणि इतर अरबी देशांकडून २० डॉलर प्रति सिलिंडरने गॅस खरेदी करीत होता; मात्र आता दर दुप्पट झाल्याने सीएनजीचीही सातत्याने दरवाढ होत आहे; मात्र यामुळे सीएनजी असो वा पेट्रोल-डिझेल. कोणतेही वाहन चालवायचे नको रे बाबा असे म्हणायची वेळ आता वाहनचालकांवर येऊन ठेपली आहे.
महागाई पाठ सोडत नाही
पेट्रोल ३० टक्के महाग : गेल्या वर्षभरात सातत्याने पेट्रोलची दरवाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी ९० रुपयांच्या आसपास असलेले दर मे २०२२ अखेरपर्यंत १२० रुपयांपर्यंत पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोलचे दर कमी झाले आहेत; मात्र सध्या जे दर आहेत. तेही सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. गेल्या वर्षभरात ३० रुपयांपर्यंत पेट्रोलचेे दर वाढलेले आहेत.
डिझेल २० टक्के महागले : पेट्रोलबरोबर डिझेलचे दरही वर्षभरात सातत्याने वाढले आहेत. वर्षभरापूर्वी ७८ रुपये प्रतिलिटर असलेले डिझेल मे २०२२ अखेरपर्यंत १०२ रुपयांवर पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोलबरोबर डिझेलचे दरही कमी झाले आहेत; मात्र ही कपात फारशी नसल्याने वाहतूकदार त्रस्त आहेत. वर्षभरात साधारणपणे २४ ते २५ रुपयांपर्यंत डिझेलचे दर वाढले आहेत.
सीएनजीच्या दरात झपाट्याने वाढ : आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या घडामोडींमुळे सीएनजीचे दर सातत्याने वाढवले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने वाहनचालकांना सीएनजीचा आधार होता. मात्र, वर्षभरात सीएनजीचे दर जवळपास २६ ते २७ रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळे सीएनजीही पेट्रोल-डिझेलची बरोबरी करू लागल्याने गाड्या चालवायच्या की नाही, असा प्रश्न आता वाहनचालकांना पडू लागला आहे.
काय आहेत दर (प्रतिलिटर/प्रतिकिलोचे दर)
इंधन प्रकार/१ जानेवारी २०२१/१ जानेवारी २०२२/१ जून २०२२
पेट्रोल/ ९० रुपये/ १०९ रुपये/ ११० रुपये ८७ पैसे
डिझेल/ ७८ रुपये ९७ पैसे/ ९२ रुपये ५० पैसे/ ९५ रुपये ३६ पैसे
सीएनजी/ ५५ रुपये ५० पैसे/ ६६ रुपये/ ८२ रुपये
वाहनचालक काय म्हणतात...
इंधन दरवाढीमुळे इतर दैनंदिन घरगुती वस्तूंची महागाई सातत्याने वाढत आहे. त्या मानाने नोकरदारांचे पगारवाढ होत नाहीत. पूर्वी दुचाकीमध्ये ३०० रुपयांचे पेट्रोल टाकले की आठवडाभर पुरायचे. आता मात्र जवळपास दुप्पट पैसे माेजावे लागत आहेत. म्हणजे दरदिवशी १०० रुपयांचे पेट्रोल लागत आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी सायकल वापरावी लागणार आहे.
- अजय कदम, दुचाकीचालक
आमची टुरिस्ट गाडी आहे. पेट्रोल-डिझेल परवडत नाही म्हणून वर्षभरापूर्वी सीएनजी बसवून घेतला; मात्र सीएनजीही आता पेट्रोल-डिझेलची बरोबरी करू लागला आहे. गेले काही महिने आम्ही हा खर्च सहन करत होतो. आता आमच्या आवाक्याबाहेर गेल्याने नाईलाजाने आम्हाला प्रतिकिलोमीटरचे दर वाढवावे लागले आहेत; मात्र त्यामुळे त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे.
- तुकाराम शिंदे, चारचाकी वाहनचालक