पुणे :डिझेलचे दर झपाट्याने वाढल्याने मालवाहतूकदेखील महागण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात डिझेलची सातत्याने दरवाढ झाली आहे. मागील वर्षीच्या सुरुवातीला ७० रुपये प्रतिलिटर डिझेलचेही दर सध्या १०० रुपयांहून अधिक झाले आहेत. वर्षभरात डिझेलचे दर ३० रुपयांनी वाढले आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम मालवाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून मालाची आयात करताना त्याचा दरावर परिणाम होत असल्याने किराणा मालासह दैनंदिन सर्वच वस्तूंच्या किमतीवर परिणाम होत असल्याने प्रचंड भाववाढ होत आहे. मात्र, त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
आठवडाभरात डिझेलमध्ये ३ रुपयांची वाढ
डिझेलचे दर (प्रति लिटर)
३१ मार्च - ९८.९४
०१ एप्रिल - ९८.९४
०२ एप्रिल - ९९.७७
०३ एप्रिल - १००.६०
०४ एप्रिल - १०१.०१
०५ एप्रिल - १०१.८४
विमा महागला
मालवाहतूक करणाऱ्या वाहने तसेच संबंधित मालाचा विमा काढला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांत विमाही महागला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता ५०० रुपयांपासूत ते २५०० रुपयांपर्यंत दर वाढले आहेत.
वर्षभरात डिझेल ४० रुपयांनी महागले
वर्षभरात सातत्याने डिझेलचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. त्यामुळे घरगुती किराणा मालाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. वर्षभरात तब्बल ४० रुपयांनी वाढले आहेत. निवडणुकांमुळे मागील तीन महिन्यांत दर स्थिर होते. मात्र गेल्या १५ दिवसांपासून पुन्हा दररोज भाव वाढत आहेत.
सगळ्याच वस्तूंच्या किमती महागणार
गेल्या १५ दिवसांत डिझेलचे दर ९ रुपयांनी वाढल्याने याचा सर्वाधिक फटका मालवाहतुकीला बसला आहे. परिणामी सर्वच मालाच्या किमती वाढत आहेत. बांधकाम साहित्य, स्टील, वीट, वाळू, सिमेंट तसेच घरगुती साहित्य, दैनंदिन किराणा मालाचे दर प्रचंड वाढले आहेत. त्याचबरोबर खाद्यतेलाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत. मात्र, तरीही महागाई थांबण्याचे नाव घेत नाही.
भाववाढीमुळे गणिते बिघडली
इंधन दरवाढीमुळे उत्पन्नावर मर्यादा आली आहे. त्यामुळे दैनंदिन ठरावीक अंतराच्या भाड्यामध्ये आम्हाला वाढ करावी लागली आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याने उत्पन्न घटले आहे.
- रमेश कदम, ट्रकचालक