सर्वसामान्य मेटाकुटीला : पेट्रोल १०८ तर डिझेलचे ९५ रुपये प्रतिलिटर दर
अभिजित कोळपे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य आणि केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कमी करणार असे सांगितले होते. मात्र, अद्याप याबाबत दोन्हीकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यातील पेट्रोल साधे १०५, पॉवर १०८ रुपये तर डिझेल प्रतिलिटर ९५ रुपयांपर्यंत गेले आहेत. आधीच वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच आता दररोज पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.
राज्य सरकार स्वच्छता, शिक्षण, दारूबंदी आणि सेस यावर साधारणतः १० रुपये कर आकारत आहे. तो कमी करणे अपेक्षित आहे, असे जाणकारांचे मत आहे. सध्या राज्य सरकार पेट्रोलवर ३४-३६, तर केंद्र सरकार ३०-३२ रुपये कर आकारत आहे. याबाबत दोन्ही पातळीवरून कर कमी करण्यासंदर्भात सूतोवाच करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत केंद्र अथवा राज्य सरकारने सर्वसामान्यांना कोणताही दिलासा दिला नाही.
अंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर मागील वर्षभरात ६० रुपयांवरून प्रतिबॅरल ७५ रुपये झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मागील महिनाभरात पेट्रोल ९ रुपये तर डिझेल १० रुपयांनी वाढले असल्याचे चित्र आहे.
---
सौदी अरब करतेय निम्मेच उत्पादन
वर्षभरापासून सौदी अरबने पेट्रोलचे उत्पादन कमी केले आहे. ते अद्याप वाढवले नाही. त्याच्या परिणामामुळे देखील पेट्रोलचे दर वाढत आहे. पूर्वी सौदी अरब प्रति दिवशी ४ बिलियन बॅरल पेट्रोलचे उत्पादन करत होते. जवळपास वर्षभरापासून ते निम्मेच म्हणजे २ बिलियन बॅरल उत्पादन करत आहे. त्यामुळे देखील भारतात सातत्याने पेट्रोलचे दर वाढत असल्याचे जाणकारांचे निरीक्षण आहे.
---
कोट
केंद्र आणि राज्य सरकारने कर आकारणी कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. केंद्र सरकार लवकरच याबाबत कर कमी करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे. त्यामुळे येत्या ८-१० दिवसांत पेट्रोलचे भाव ४-५ रुपयांनी कमी होतील. त्याच पद्धतीने राज्य सरकारनेही आपला कर कमी केल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.
- अली दारुवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशन
----
इराणकडून येणारे डिझेल आयात बंद
अमेरिकेच्या दबावामुळे इराणकडून भारतात येणारी ७०-८० टक्के डिझेलची आयात पूर्णपणे बंद झाली आहे. त्याच्या परिणामामुळे देखील मागील काही महिन्यात डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत.
----
पेट्रोल-डिझेलचे प्रतिलिटर भाव
दिनांक साधे पेट्रोल पॉवर डिझेल
१० जून १०१.७० १०५.३८ ९२.३७
१४ जून १०२.२४ १०५.९१ ९२.९१
१८ जून १०२.७४ १०६.४२ ९३.३४
२२ जून १०३.२८ १०६.९७ ९३.९०
२६ जून १०३.८७ १०७.५५ ९४.३४
२९ जून १०४.५४ १०८.२२ ९४.८८