लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून वाढत जाणाऱ्या इंधनाच्या दराने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. पेट्रोलचे दर १०७.४५ रुपये इतके आहे, तर डिझेलचे दर प्रतिलिटर ९५.६० रुपये इतके आहेत. तर विमानात वापरले जाणारे एटीएफ इंधनचे दर प्रतिलिटर केवळ ६० रुपये आहेत. म्हणजेच पेट्रोलच्या किमतीपेक्षा विमानाचे इंधन अर्ध्या किमतीने स्वस्त आहे. विमानाच्या इंधनापेक्षा पेट्रोल महाग असल्याने सामान्यांना वाहन चालविणे परवडणारे नाही.
विमान प्रवास हा अन्य प्रवासी वाहतुकीच्या साधनापेक्षा महाग समजला जातो. मात्र, त्याच्या इंधनाचे दर हे पेट्रोलपेक्षा खूप कमी आहेत. आणि रिक्षा, एसटी, बसेस, दुचाकी, चारचाकीतून फिरणाऱ्या सामान्य माणसाला मात्र विमानापेक्षा महागड्या पेट्रोल, डिझेलचा वापर करून प्रवास करावा लागत आहे.
१) पुण्यातील पेट्रोलचा दर : १०७.४५ प्रति लिटर
विमानातील इंधन एटीएफ - ६० रुपये
२) शहरातील पेट्रोल पंप - ६०
दररोज लागणारे पेट्रोल - ३० लाख लीटर
३) शहरातील वाहनांची संख्या
(२०१६ ते जुलै २०२१ पर्यंत आरटीओकडे नोंद झालेली)
दुचाकी - ८, ३७, ३९७
चारचाकी - २, ५२, ३७३
४) कोरोनामुळे खर्च झाला दुप्पट :
कोरोना प्रसाराच्या भीतीने अनेक जण प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे बंद केले आहे. अनेकांनी दुसऱ्या लाटेनंतर स्वतःची दुचाकी व चारचाकी वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकीच्या विक्रीत देखील वाढ झाली आहे. असे असले तरीही त्यांना पेट्रोलवर आता दुप्पट खर्च करावा लागतो आहे.
कोट :
पेट्रोलच्या वाढत जाणाऱ्या दरांमुळे महिन्याचा बजेटवर परिणाम होत आहे. ऑफिस दूर असल्याने वाहन वापरणे अपरिहार्य आहे. मात्र शक्य तितकी काटकसर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुट्टीच्या दिवशी सायकलचा वापर सुरू केला आहे.
- सुनील कुलकर्णी, वाहनधारक, पुणे