लोणी काळभोर : पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नकोस असे सांगितल्याच्या कारणावरून तिघा जणांनी पेट्रोल पंपावर काम करणा-या कर्मचा-याला लाथाबुक्यांनी मारहाण करत केली. तसेच पेट्रोल पंप पेटवून देण्याची धमकी देत त्याच्याकडील १८ हजार ८१२ रुपये जबरदस्तीने हिसकावले. ही घटना बुधवारी (दि.११ एप्रिल) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भात पेट्रोल पंपावरील कामगार किरण नातू कुंजीर (रा. वळती, ता. हवेली) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सूरज गायकवाड (रा. ऊरूळी कांचन ), संदेश दिलीप कुंजीर (रा. वळती ) व एक अज्ञात तरूण या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कुंजीर हे लता बापूसाहेब जराड पाटील यांच्या मालकीच्या शिंदवणे येथील जय मल्हार पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल सोडण्याचे काम करतात. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी सूरज हा सिगारेट ओढत पंपावर आला. त्यावेळी त्याला किरण याने पंपाच्या आवारात सिगारेट ओढू नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने सूरज याने कुंजीर यांना शिवीगाळ करत मी येथेच सिगारेट ओढणार, जास्त बोलू नकोस नाहीतर मी पंप पेटवून देईन अशी धमकी देत आपल्या दोन साथीदारांसह लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान,अनोळखी तरुणाने त्यांच्या खिशात हात घालून जमलेले पेट्रोल,डिझेलचे १८ हजार ८१२ रुपये जबरदस्तीने काढून घेतले. कुंजीर यांनी आरडाओरडा केल्याने पेट्रोल पंपासमोरच्या हॉटेल चालवत असलेला त्यांचा भाऊ मदतीला येत असल्याचे पाहून तिघा आरोपींनी पळ काढला. पंपमालकांचा मुलगा युवराज जराड यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात जाऊन तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहे.
पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नको सांगणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण, रोख रक्कमही लुबाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 5:23 PM
पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नकोस असे सांगणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम देखील हिसकावली.
ठळक मुद्देपंप पेटवून देण्याची धमकी देत १८ हजार ८१२ रुपये हिसकावले