पुणे : कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) कपात केलेले पैसे पीएफ आॅफिसमध्ये जमा न करता त्याचा अपहार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर येथे फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०१३ व आॅगस्ट २०१५ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला.प्रमोद लक्षणप्रसाद खंडेवाल (रा. अमरावती), गोपाल मोतीलाल गुप्ता (रा. ओल्ड कॉटन मार्केट रोड, अमरावती), परेश खंडेलवाल (रा. निको गार्डन, विमाननगर) व एका महिलेविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधी विभागाचे प्रर्वतक राकेश आचार्य (वय ४०, सहकारनगर) यांनी याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमाननगर येथील क्लासिस टेक्नोलॉजिस या कंपनीमधील चित्तरंजन पटनाईक, संदीप साबळे यांच्या पीएफचे पैसे संचालकांनी कपात करून घेतले होते. मात्र प्रत्यक्षात ते पीएफ आॅफिसकडे जमा न करता त्याचा अपहार केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक डी. जे. जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
पीएफचे पैसे बुडविणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: April 29, 2017 4:20 AM