सांगवी,शिरवलीच्या तरुणांचा पुढाकार
प्रशासनाच्या ढिसाळ
कारभारावर नागरिकांचा संताप
सांगवी : दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर पंधरा दिवस उलटले तरीदेखील प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या ढिसाळ व असंवेदनशील कारभाराचा निषेध केला आणि सांगवी व शिरवली गावच्या १५ ते २० तरुणांनी एकत्र येत बारामती-फलटण रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली धोकादायक काटेरी झाडे काढून टाकली.
शिरवली हद्दीतील जरांडेवस्ती लगत असणाऱ्या चारीच्या पुलावर २४ जुलै रोजी दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे वळणावर अंदाज न आल्याने एका अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली होती. या अपघातात राजस्थान राज्यातील एका २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एखाद्या निष्पापाचा बळी जाऊ नये यासाठी सांगवी गावाचे तरुण ग्रामपंचायत सदस्य प्रणव तावरे यांच्यासह तरुणांनी पैसे गोळा करून जेसीबीच्या साह्याने झाडे तोडण्यात आली. तसेच या तरुणांनी संपूर्ण दिवस काटेरी झुडपांची विल्हेवाट लावण्यात घालवली. यामुळे वळणावरील रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, वाहनचालकांसह नागरिकांनी या तरुणांचे कौतुकास्पद अभिनंदन केले आहे.
रस्त्याच्या कडेने वाढलेली दुतर्फा काटेरी झुडपे वाहनचालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू लागली होती. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करताना पाहायला मिळाले. गेंड्याची कातडीच्या प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर तरुणांनीच पैसे गोळा करून ही दुतर्फा वाढलेली झाडे हटवून त्याची विल्हेवाट लावली. झाडांमुळे समोरील येणारी वाहने दिसत नसल्याने अनेक झाडे या रस्त्यावर साक्षात 'मृत्यू' बनून उभी होती. बारामती-फलटण हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच अनेक ठिकाणी पडलेले खड्डे जसेच्या तसे आहेत. यामुळे वाहनचालकांची क्रूर चेष्टा लावल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडल्या, आजपर्यंत या रस्त्याची दुर्दशा कायम आहे.
-----------------------
फोटो ओळी : रस्त्यावरील दुतर्फा वाढलेली झाडे, दुसऱ्या चित्रात हटविण्यात आलेली झाडे.
१००८२०२१-बारामती-०१
--------------------------