सासवड :पालखी महामार्गावर सासवडजवळ ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात फलटण तालुका क्रीडा अधिकारी व राष्ट्रीय अॅथलॅटिक प्रशिक्षक गजानन पाटील ( वय ५५ वर्षे ) यांचे निधन झाले आहे. सासवड - जेजुरी रस्त्यावर सासवड हद्दीत कऱ्हा नदीच्या पुलापलीकडे हॉटेल जगदंबसमोर बुधवारी ( दि १८ ) सकाळी ११ . ४५ च्या सुमारास हा अपघात घडला. याबाबत या अपघातातील ट्रकचालक मोरेश्वर नारायण शिंदे ( वय ५२ वर्षे ) रा. मोरगाव, ता बारामती यांनी सासवड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. सासवड पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ( दि १८ ) सकाळी ११ . ४५ च्या सुमारास जेजुरीकडून पुण्याकडे जाणारा ट्रक ( एमएच. १२. आरएन. ३२१० ) याला विरुद्ध बाजूने व ओव्हरटेक करताना मारुती स्विफ्ट कार ( एमएच.१२. एनजे. ५७३० ) ने धडक दिली. या अपघातात कारमधील गजानन पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना सासवड येथील एक खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरु असतांना पाटील यांचा मृत्यू झाला. गजानन पाटील हे मूळचे सांगलीतील असून सध्या ते पुण्यातील जांभूळवाडी येथे राहत होते. फलटण येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून ते काम करीत होते. ते राष्ट्रीय अॅथलॅटिक प्रशिक्षक असून पुण्यातील बालेवाडी येथेही क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम करीत होते.
सासवडजवळ अपघातात फलटणचे क्रीडा अधिकारी गजानन पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 8:09 PM