पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवक चाळ आणि वसतिगृहातील मुलांमध्ये गुरुवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. सेवकचाळ आणि विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी होण्याची ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी आदित्य प्रभू देसाई (वय २४), अरुण विजय काशीद (वय २३, रा. दोघेही सेवक चाळ), सचिन खडकसिंग रजपूत (वय २९), अशोक चंद्रकांत पाटील (वय २९) व मारुती दत्तात्रय आवरंगड (वय ३२, तिघेही रा. पाच नंबर होस्टेल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई श्याम सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांकडून विद्यापीठाच्या आवारातच पाचपेक्षा जास्त संख्येने एकत्र फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत १३७ प्रमाणे नोटीसही बजावण्यात आली आहे. याचा विद्यार्थ्यांनी निषेध केला असून तीव्र आक्षेप नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठात गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा धक्का लागण्याच्या कारणावरून देसाई आणि काशीद यांचे रजपूत आणि पाटील यांचे एकमेकांसोबत भांडण झाले. भांडणाच्या आवाजामुळे काही वेळातच हॉस्टेलचे विद्यार्थी खाली आले. यामुळे गोंधळ सुरू झाला. (प्रतिनिधी)
पुणे विद्यापीठात हाणामारी
By admin | Published: April 01, 2017 2:15 AM