‘जेनेरिक ड्रगस् या उपक्रमाद्वारे सर्वांसाठी औषधे सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. त्याची विक्रमी, गुणात्मक उत्पादने यासाठी लागणारा कच्चा-माल या गोष्टींची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली. ‘आत्मनिर्भर भारत’या दिशेने ही एक गरुडझेप आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करुन रोग-निदान, रोग-प्रतिबंध, रोग-निवारण यासाठी होत असलेला विस्तार हे ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने मोठे पाऊल आहे. मेडिकल डिव्हायसेस, मेडिकल इक्विपमेंट आदी उत्पादने हे ‘स्टार्ट अप’साठी नवे दालन आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची, जैव-वैधक, बायोटेक्नोलॉजी यासोबत होणारी ‘नवीन युती’ फार्मसीच्या कक्षा विस्तारित आहेत.
‘गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा’ ही तर फार्मसिस्टची पारंपरिक जबाबदारी आहे. त्यात बायोकिव्हीलन्स, फार्माकोकिनिटीक्स, व्हॅकसीनेशनची भर पडत आहे.
अशा प्रकारे संशोधन, उत्पादन, विपणण, आधुनिक तंत्रज्ञानासह व्यवस्थापन व गुणवत्ता-नियंत्रण, आरोग्यसेवा याव्यतिरिक्त निसर्ग-औषधे, न्युट्रास्युटिकल्स, सौदर्य-प्रसाधने आदी बाबत सर्वसमावेशक ज्ञानाचा समावेश औषधनिर्माणशास्त्रात केला गेला.
जगातील इतर देशांमध्ये फार्मसी अभ्यासक्रम फक्त आरोग्य-सेवेपुरताच मर्यादित असल्याने भारतीय फार्मसीस्टचे एक वेगळे रसायन सिद्ध होते. आपल्या देशात फार्मसी शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता निकष व मान्यतेबाबत सर्व अधिकार ‘फार्मसी कौन्सिल आॅफ इंडिया’कडे आहेत. नवीन शैक्षणिक धोरणास अनुषंगीक नावीन्यपूर्ण बदल करुन एक समान-नवीन अभ्यासक्रमाचा आराखडा सर्व स्तरावर लागू केलेला आहे. सदर अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा समावेश असल्याने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.ई.) ह्यांची मान्यता घेण्याची मुभासुद्धा उपलब्ध आहे. यामुळे ए.आय.सी.टी.ई.च्या विविध योजनांचा आर्थिक लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकतो.
नवीन औषध शोधकार्यात म्हणजे क्लिनिकल संशोधनामध्ये भारतीयांना विशेष प्राधान्य मिळत आहे. त्याशिवाय आरोग्य विमा, कापोर्रेट रुग्णालयामध्ये नवीन संधी त्यांना खुणावत आहेत. मागील आठवड्यात अमेरिका, जपान, आॅस्ट्रेलिया व भारत या चार देशांना एक महत्त्वाचा ‘सामंजस्य करार ’झाला. त्यानुसार भारताकडे औषध उत्पादनाची जबाबदारी देण्याचे ठरवले. त्याद्वारे आपल्या फार्मसी ज्ञानाची व कौशल्याची पावतीच मिळाली आहे. पण ही गुणवत्ता व त्याची शाश्वत वाढ टिकविण्याची जबाबदारी विद्यार्थी, प्राध्यापक, उत्पादक व इतर भागधारकांवर येते. हे वेगळे सांगाला नको, मात्र प्राप्त परिस्थितीत होऊ घातलेल्या स्थित्यंतरांचे आव्हान पेलून गुणवत्ता टिकवणे ही महाविद्यालयांवर मोठी जबाबदारी आहे, हे या निमित्ताने स्पष्ट होते.
- डॉ. के. एन. गुजर ,अध्यक्ष : महाराष्ट्र फार्मसी प्राचार्य संघटना ,तथा प्राचार्य सिंहगड कॉलेज आॅफ फार्मसी पुणे.
———————————————————